शिपाईसोडून सर्वांना निलंबित करा, सरकारी कार्यालयाला टाळं, या अधिकाऱ्याकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव, आता निर्णयाची प्रतीक्षा
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी अजब प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. या प्रस्तावात त्यांनी स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यात नेमकं काय घडलं हे पाहुया.
गडचिरोली, 29 ऑगस्ट 2023 : गडचिरोली हा आदिवासी तसेच नक्षलग्रस्त जिल्हा. या भागात सहसा चांगले कर्मचारी जाण्यास तयार नसतात. अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून वैभव वाघमारे हे एक महिन्यापूर्वी रुजू झाले. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, कर्मचारी काही ऐकेनात. सामान्य व्यक्ती शासकीय कार्यालयात जातो. तेव्हा त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. छोट्या छोट्या कारणासाठी सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल सामान्य व्यक्तीच्या मनात चीड निर्माण होते. वैभव वाघमारे यांनी गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार समजावून सांगितलं. पण, त्यांच्यात काही सुधारणा दिसली नाही. त्यामुळे वैभव वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाडसी प्रस्ताव पाठवला आहे. एक शिपाई वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करा, असा हा प्रस्ताव आहे.
महिनाभरात कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा नाही
अहेरी उपविभागात सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली या तालुक्यांचा समावेश होतो. अहेरी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा क्षेत्र आहे. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या लोकांचे प्रमाणही मोठे आहे. परंतु, अहेरी उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी समाधानकारक काम करत नाहीत, असा अनुभव वैभव वाघमारे यांना आला. वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. पण, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही सुधारणा होताना दिसली नाही.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी कार्यालयाला ठोकले कुलूप
उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी कार्यालयीन कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न केला. वारंवार कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पण, या सूचनांची अंमलबजावणी होताना त्यांना दिसली नाही. या सर्व बाबींना त्रासून अखेर त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. वैभव वाघमारे यांनी घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे.या कारवाईमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अशा कारवाई केल्याशिवाय नागरिकांची कामे त्वरित होणार नाही, अशा प्रतिक्रिया येत आहेत.
प्रस्तावात नेमकं काय?
वैभव वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार, एक शिपाई वगळता इतर सर्व कर्मचारी काही काम करत नाहीत नाहीत. त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव वैभव वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.