धक्कादायक बातमी! राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ पक्षात भूकंप, रविकांत तुपकर यांची हकालपट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठा भूंकप आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा होती. यानंतर आता पक्षाच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. "आजपासून आमचा तुपकर यांचा काहीही संबंध नाही. यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा काहीही संबंध असणार नाही", असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्य जालिंदर पाटील म्हणाले आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठा भूकंप आला आहे. राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते आमदार रविकांत तुपकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात मतभेद असल्याची माहिती समोर येत होती. अखेर या मतभेदांनी टोक गाठलं आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षाकडून रविकांत तुपकर यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जालिंदर पाटील काय म्हणाले?
“लोकसभेत राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत. संघटना नेते रविकात तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांना संघटेने लाल दिवा दिला, पद दिले. एकदा पक्ष सोडला, नंतर परत आले. काम करत राहिले. ते अलिकडे तीन ऊस परिषदेत उपस्थितीत राहिले नाहीत. ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. शिस्तभंग समिती नेमली. त्यांना पत्र दिलं ते आले नाहीत. सदाभाऊ खोत यांना पण आणले होते समिती समोर, सदाभाऊ मंत्री असताना आले होते शिस्तपालन समिती समोर, त्यांनी उत्तरे दिली होती”, असं जालिंदर पाटील म्हणाले.
“रविकांत तुपकर पक्ष राज्य कार्यकारिणीला देखील उपस्थितीत राहिले नाहीत. रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले. आता लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं काम केलं. पण राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिले. तुपकर यांच्यामुळे चळवळीचे नुकसान होत आहे. सोशल मीडियामधून बोलत राहिले. पण तुपकर भूमिका बदलायला तयार नाहीत. त्यामुळे अनेक स्थानिक प्रश्न आम्ही सोडवले. अलीकडल्या काळात स्वाभिमानी संघटना माझी आहे असंच ते सांगत आहेत. पण 26 सप्टेंबर 2019 ला तुपकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजनामा दिला आहे”, अशी माहिती जालिंदर पाटील यांनी दिली.
“गेल्या तीन चार वर्षात ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले नाहीत. आजपासून आमचा तुपकर यांचा काहीही संबंध नाही. यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा काहीही संबंध असणार नाही. तुपकर यांची नाराजगी त्यांनी स्पष्ट करावी ते असं का वागले? तुपकर विरोधात का बोलतात? त्यांना पुढचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघत होतो. प्रत्येक गोष्ट स्वतंत्र निर्णय घेत आहेत, त्यामुळे आम्ही बंधन किती ठेवायचं?”, असा सवाल जालिंदर पाटील यांनी केला.
‘असा निर्णय घेतील मला अपेक्षित नव्हतं’, तुपकर यांची पहिली प्रतिक्रिया
रविकांत तुपकर यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिलीय. “22 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जिवाचं रान केलं, त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून असा निर्णय धक्कादायक आहे. राजू शेट्टी आणि माझ्यामध्ये का दुरावा निर्माण झाला हे मला माहिती नाही. कांदा आणि धानासाठी आंदोलन केले ही आमची चूक आहे का? राजू शेट्टींनी असा निर्णय घेतील मला अपेक्षित नव्हतं. 24 तारखेला आम्ही बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत पुढील निर्णय घेणार आहोत. संघटनेत मी कायम सक्रिय होतो सक्रिय नव्हतो असं म्हणत असतील तर ते खोटं आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.