आई काय करु गं मी? स्वप्निलचे ते शेवटचे शब्द ऐकून माऊलीला अश्रू अनावर, शेवटच्या 24 तासात काय चालू होतं त्याचं?
'सकाळी जाताना मी त्याला विचारले, बाळा जाऊ का रे, हे म्हणले, भैय्या उठ आता नऊ वाजले, आम्ही निघालो. उठा आवरा तुमचं. हो, आवरतो म्हणला. आई तुमचं तुम्ही जा, मी उद्यापासून अभ्याला घेईन, एवढं मला तो बोलला'

एमपीएससीमुळे (MPSC) स्वप्निल लोणकरनं आत्महत्या केली. तो गुणवान होता. त्याच्या बुद्धीमत्तेची चमक त्याच्या यशातूनच दिसते. स्वप्निलच्या जाण्यानं महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय. त्याच्यात स्वप्निल कुटुंबियांवर कोसळलेल्या दु;खाच्या डोंगरानं महाराष्ट्र सुन्न आहे. पण शेवटच्या काही तासात स्वप्निलच्या मनात काय चाललं होतं हे महत्वाचं आहे. स्वप्निलचा स्वत:च्या आईसोबत चांगला संवाद होता असं दिसतंय.
आई काय करु गं मी स्वप्निलच्या आई टीव्ही 9 शी बोलताना म्हणाल्या की- आदल्या रात्री तो माझ्याशी बोलला होता. आई काय करु गं मी, खाजगी नोकरी तरी सध्या मला आहेत का. माझ्याशी बोलला, माझ्या हाताला धरुण आणलं. म्हणला, आई बोल पाच मिनिटं. आपण बोलुया. या सगळ्या विषयावरती चर्चा केली. मी म्हणलं, बाळा जाऊ दे, कर अभ्यास चार महिने. पुढं नोकरी बघ. आपली दहा पंधरा हजाराची कर. पण त्याच्या स्वप्नातून त्याला वेगळं करायचं म्हटलं की, जरा दडपण आलंच की, मी काय स्वप्नं पाहिलं होतं. मी इथपर्यंत पोहोचलो. कसा कसा पोचलो. माझ्या आई वडीलांनी कसं पोचवलं. मला ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळं मला दुसरं पाऊल उचलायला लागतंय. ते त्याच्या मनाला वाटलं असल थोडसं की, बाबा हे मी हे काय करतोय आणि काय करावं लागतंय. हे आम्हाला दाखवून नाही दिलं त्यानं. पण आदल्यादिवशी तो माझ्याशी बोलला होता तो’.
नोकरी नसण्याचं टेन्शन स्वप्निलच्या आई पुढे म्हणाल्या की, ‘तो मला म्हणाला आई, अजून नोकरी नाही, कसं व्हायचं आपलं. त्याला ह्याचं जास्त टेन्शन होतं की दोन वर्षे गेली. पासआऊट होऊन दोन वर्षे गेली. दोन वर्षे वाया गेली अजून दोन वर्ष जाणार. 27 व्या वर्षी माझं असं झालंय. तुमचं मला हे पुढचं दिसतंय. मला तुमचे रोजचे कष्ट दिसतात. ते ओझं वाढत चाललंय. बोलला तो माझ्याशी. आणि नेहमी बोलायचा’.
सकाळी काय बोलणं झालं? स्वप्निलच्या आई सांगतात- ‘सकाळी जाताना मी त्याला विचारले, बाळा जाऊ का रे, हे म्हणले, भैय्या उठ आता नऊ वाजले, आम्ही निघालो. उठा आवरा तुमचं. हो, आवरतो म्हणला. आई तुमचं तुम्ही जा, मी उद्यापासून अभ्याला घेईन, एवढं मला तो बोलला. उद्यापासून मी अभ्यास करेन म्हणला. चार महिन्याचा. दुपारी ही घरी नव्हती (स्वप्निलची बहिण). हिला सोडलं. आम्हालाबी वेळ नाही. आमचं पण सर कसं झालंय, ह्या कोरोनामुळं आम्हाला पण नाही ना धंदा. व्यवसाय नाही राहीला. आम्ही दोघं मरमर करतो. हाय तेवढं करतो. घरी येतो. त्याचं त्याला टेन्शन आलं. आम्ही नाही दिलं. त्याला दाखवलं पण नाही. पण तो मनानं तेवढा होता ना’. (Swapnil lonkar last talk with his mother)