तलाठी भरती प्रकरणात महत्वाचे अपडेट, यादी १३ जिल्ह्यांत का रखडली? प्रक्रिया कधी होणार
talathi recruitment exam | राज्यात तलाठी भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात दहा लाख ४१ हजार ७१३ जण पात्र ठरले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात २३ जिल्ह्यांची यादी आली आहे. परंतु १३ जिल्ह्यांची यादी रखडली आहे. कारण...
पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2024 | राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी गेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्याकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे. परंतु ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात सुरु झालेली नाही. २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी जाहीर झाली. परंतु १३ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरु नाही. यामुळे दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अंधारात आले आहे. भरतीची २३ जिल्ह्यांमधील प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्तिपत्रे वाटप होणार आहेत.
निवड यादीत २५२६ उमेदवार
राज्यात तलाठी भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात दहा लाख ४१ हजार ७१३ जण पात्र ठरले होते. त्यापैकी परीक्षा देणाऱ्यांची संख्या आठ लाख ६४ हजार ९६० आहे. परीक्षा झाल्यानंतर आक्षेप मागवणे, त्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी यादी २३ जिल्ह्यांत प्रसिद्ध करण्यात आली. निवड यादीत सुमारे २५२६ उमेदवार आहेत. परंतु राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अजून काहीच प्रक्रिया नाही.
का नाही १३ जिल्ह्यांत प्रक्रिया
राज्यातील १३ जिल्हे आदिवासीबहुल आहे. त्यात ठाणे, पालघर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू आहे. यामुळे या जिल्ह्यांबाबत १७ संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे ही प्रक्रिया राहिली आहे. या जिल्ह्यांतील यादी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच प्रसिद्ध होणार आहे. यामुळे सध्या या जिल्ह्यातील १९३८ मेदवारांचे भवितव्य तूर्त अधांतरी आहे.
राज्यातील अनेक उमेदवार तलाठी होण्याचे स्वप्न पाहत आहे. परंतु पेसा कायदा लागू असलेल्या १३ जिल्ह्यातील युवकांचे तलाठी बनण्याचे स्वप्न सध्या तरी लांबणार आहे.