Taliye Landslide : तुमचं दु:ख आम्ही जाणतो, उद्ध्वस्त तळीयेसाठी माळीणवासियांकडून मोठी मदत
पाच दिवसानंतर अखेर आज तळीयेतील बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. मात्र, बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी 25 हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.
पुणे : महाड शहरात एकीकडे मुसळधार पाऊस आणि महापुराने होत्याचं नव्हतं केलं. तर दुसरीकडे तालुक्यातील तळीये मधलीवाडी गाव दरड कोसळल्यानं उद्ध्वस्त झालं. ही दुर्घटना पाहून 2014 सालच्या माळीणची अनेकांना आठवण झाली. तळीये गावात ढिगाऱ्याखालून तब्बल 53 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं. मात्र, अद्यापही 32 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. पाच दिवसानंतर अखेर आज तळीयेतील बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. मात्र, बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी 25 हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे. (25 thousand help for Taliye village from the villagers of Malin)
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात 30 जुलै 2014 मध्ये असाच एक डोंगर काळ बनून कोसळला होता. रात्री झोपलेलं संपूर्ण गाव सकाळी नाहीसं झालं होतं. डोंगराचा कडा कोसळून 44 घरं गाडली गेली होती तर 151 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 6 वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. माळीण गावातील नागरिकांना तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणून तळीयेतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी मोठी मदत देऊ केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे माळीच्या ग्रामस्थांनी 25 हजाराचा धनादेश सुपूर्द केला आहे.
तळीयेतील बचावकार्य थांबवलं
गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. तसेच आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, त्याशिवया आम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
अजूनही 32 नागरिक बेपत्ता
पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. डोंगराच्या दरडीबरोबर दोन ते चार किलोमीटरपर्यंत हे नागरिक घरंगळत गेले असावेत असं सांगितलं जातं. त्यामुळे या संपूर्ण दोनचार किलोमीटरच्या परिसरातही शोधाशोध करण्यात आली. यावेळी पाऊस जास्त असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत होता. तसेच सर्वत्र चिखल झाल्याने त्यातून मार्ग काढत जाणंही कठिण होत होतं.
संबंधित बातम्या :
25 thousand help for Taliye village from the villagers of Malin