उमेश पारीक, लासलगाव, नाशिक : नेहमी तहसीलदारांना हवी असणारी फाईल आणून देणे, त्यांना अन् त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चहा-पाणी देणे, त्यांनी सांगितलेली सर्व कामे पार पाडणे, ही कामे तहसीलदारांचा शिपाई नेहमीच करत असतो. ४० वर्षांच्या या सेवेत अनेक तहसीलदार त्यांनी पाहिले अन् सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार केले. मग त्या शिपायाचा अनोखा सन्मान केले गेला. नाशिक जिल्ह्यात निवृत्त होणाऱ्या शिपायाला एका दिवसासाठी तहसीलदार बनवण्यात आले.
कोणाचा केला सन्मान
गेली चाळीस वर्षे सिन्नर तहसीलदारांच्या दालनाची व्यवस्था बघणाऱ्या शिपाई बाळासाहेब गवारे यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी थेट तहसीलदारांच्या खुर्चीत बसवण्यात आले. त्यांच्या सेवाकार्याचा अनोखा सन्मान करण्यासाठी तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी हा निर्णय घेतला आहे. दिवसभर शिपाई गवारे हे तहसीलदार बनले होते. त्यांच्या शेजारी बसून तहसीलदारांनी आपले कामकाज पूर्ण केले. हे चित्र पाहून गवारे यांच्यांसबोत अनेकांचा डोळे पाणावले.
शिपाई एका दिवसासाठी झाला तहसीलदार#Nashik #tahasildar pic.twitter.com/W9XnBBnKuK
— jitendra (@jitendrazavar) June 3, 2023
गवारे मामा यांना सुखद धक्का
गवारे मामा यांनी महसूल खात्यात 40 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली, त्याचा अनोखा सन्मान करण्याचा निर्णय तहसीलदार बंगाळे यांनी घेतला. नायब तहसीलदार सागर मुंदडा व अन्य सहकारी नायब तहसीलदारांसोबत चर्चा करून त्यांना एक दिवसाचा तहसीलदार करण्यात आले. मग गवारे मामा तहसीलदारांनी खुर्चीत बसले, संपूर्ण दिवसभर ते तहसीलदार होते, तर तहसीलदार एकनाथ बंगाळे हे शेजारी बसून आपले दैनंदिन काम करत होते. त्यानंतर सायंकाळी तहसीलदारांच्या गाडीतच गवारे मामा यांना आदरपूर्वक घरी पोहोचवण्यात आले.
कोतवालपासून सुरुवात
नांदूरशिंगोटे येथील असलेले गवारे मामा यांनी आपली कारकीर्द कोतवालपासून सुरु केली. नांदूरशिंगोटे गावात कोतवाल म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांना तहसील कार्यालयात शिपाई म्हणून पदोन्नती मिळाली. तेव्हापासून ते तहसील कार्यालयात शिपाई म्हणून होते. दालनाची नियमित स्वच्छता ठेवण्यासोबतच तहसीलदारांना भेटण्यासाठी येणार्यांचे आदरातिथ्यही तेच करत होते. 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.