राज्यात थंडी आणखी किती दिवस, सर्वाधिक ‘हॉट सिटी’ झाले ‘कोल्ड सिटी’
imd prediction : उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवत आहे. त्याचा फटका रेल्वेसेवा आणि विमानसेवेला बसला आहे. राज्यात तापमान घसरले आहे. राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
योगश बोरसे, पुणे, दि.16 जानेवारी 2024 | मकर संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचा पारा उतरला आहे. राज्यात सर्वात ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असणाऱ्या जळगाव शहराचा पारा सर्वाधिक घसरला आहे. जळगाव राज्यातील ‘कोल्ड सिटी’ झाले आहे. सोमवारी राज्यात जळगावचा पारा सर्वात नीचांकी 9.9 अंशांपर्यंत नोंदवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर व पुणे शहराचा पाराही 10 ते 12 अंशांवर दरम्यान होता. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू होताच तापमानात वाढ होण्याऐवजी सायंकाळनंतर तापमान घसरणे सुरु झाले आहे. राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अनेक ठिकाणी दवबिंदू
देशात यंदा मान्सून कमी झाला. अनेक राज्यात पावसाने सरासरी गाठली नाही. त्यानंतर राज्यात यंदा थंडी पडली नाही. यामुळे त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होणार आहे. परंतु आता जाता जाता थंडी पडू लागली आहे. मिनी कश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा कमी झाला आहे. लिंगमळा परिसरात गवतावर काही प्रमाणात दवबिंदू गोठले आहे. तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे महाबळेश्वरमध्ये थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही फायदा होत आहे.
राज्यात थंडीचा कडाका
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात तसेच राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत पारा तब्बल ४ अंश सेल्सियसने घसरला आहे. धुक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. आधीच थंडी त्यात प्रदूषण यामुळे दवाखाने, रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला अशा तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात गर्दी होत आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका
उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी धुक्यात हरवली आहे. राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. दिल्लीतील आजचे तापमान 4 डिग्री सेल्सियस झाले आहे. थंडीमुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धुके आहे. धुक्याचा परिणाम विमानसेवा आणि रेल्वे सेवेवर झाला आहे. राजधानी दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत. दिल्लीत पहाटेपासूनची 15 पेक्षा जास्त विमान उड्डाणास उशिरा झाला आहे. राजधानी दिल्लीतली दृश्यमानता पोहोचली 50 फुटांवर पोहचली आहे.
निफाडमध्ये पारा ७.४ वर
नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. निफाडमध्ये पारा ७.४, तर नाशिक शहरात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये दोन ते तीन दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.