एकीकडे आरोग्य विभागात बंपर भरती तर दुसरीकडे आरोग्य विभागातील 597 कर्मचाऱ्यांना दाखविला घरचा रस्ता
राज्यातील एएनएमच्या 597 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असतांना बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्रातील सद्यस्थिती तपासण्यात येणार आहे.
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात (Health Department) 10 हजार जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जाहीर केले आहेत. एकीकडे ही बंपर भरती जाहीर होत असतांना राज्याच्या आरोग्य विभागातील 597 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आरोग्य विभागाच्या 597 कर्मचाऱ्यांची (ANM) दिवाळी काळी झाली आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण असतांना आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालकांनी याबाबत पत्रक काढले असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यात नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरिता 3207 एएनएमची पदे मंजूर करण्यात आली होती.
त्यातील 597 पदांना केंद्र शासनाकडून मंजूरी व वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील एएनएमच्या 597 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असतांना त्यांना बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्रातील सद्यस्थिती तपासण्यात आली आहे.
त्यामध्ये ज्या उपकेंद्रात एकही बाळंतपण झालेले नाही, ज्या एएनएमचे काम असमाधानकारण असेल, ज्या एएनएमच्या सेवा कमी झाल्या आहेत असे निकष लावण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून एएनएमच्या संदर्भात माहिती घेतली जात असून 597 कर्मचाऱ्यांची 31 ऑक्टोबरला सेवा समाप्ती केली जाणार आहे.
सेवा समाप्ती न करता इतर पदावर त्या 597 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. उमेदीचा काळ हा शासन सेवेत घालविला असल्याने त्यांचा शासनाने विचार करावा अशी मागणी आहे. – नंदकिशोर कासार, अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघ,