लग्न समारंभ आटोपून परत जाताना एकाच गावातील 6 लोकांवर काळाची झडप
Accident | नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. लग्न समारंभ झाल्यानंतर आपल्या गावी परत जाणाऱ्यांवर काळने घडप घातली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन जण सख्ये चुलत भाऊ आहेत.

नागपूर 16 डिसेंबर | नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ताराबोडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू झाला. अपघातात निधन झालेले सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. मृतकामध्ये दोन सख्या चुलत भावाचा समावेश. हा अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
कसा झाला अपघात
नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. या लग्नासाठी वऱ्हाड नागपूरला गेले होते. शुक्रवारी ते वऱ्हाड परत गावी येण्यासाठी निघाले. मध्यरात्री सोनखांब ते ताराबोडी वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. ट्रकच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले. कारमध्ये बसलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामधील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
या सहा जणांचा मृत्यू
या अपघातात अजय दशरथ चिखले (वय 45), विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45), सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42), रमेश ओंकार हेलोंडे (वय 48), मयूर मोरेश्वर इंगळे (वय 26), वैभव साहेबराव चिखले (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. यामधील अजय चिखले आणि वैभव चिखले हे सख्ये चुलत भाऊ आहे. लग्न आटोपून आनंदात असणारे चिखले कुटुंबियांवर या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.




पोलिसांकडून मदतकार्य
अपघाताची माहिती मिळल्यावर तात्काळ पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी पोलिसांना स्थानिक नागरिकांनीही मदत केली. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णालयात पाठवण्यात आले.