TET Scam | टीईटी घोटाळा प्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल, ED कडून आरोपींची कसून चौकशी होणार
ईडीकडून टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल
मुंबईः महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) बहुचर्चित TET घोटाळ्या प्रकरणी सक्त वसुली संचलनालयामार्फत मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला झाला असून या प्रकरणी आता मुख्य आरोपी तुकाराम सुपे (Tukaram Supe) आदींसह अन्य जणांची कसून चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी (Pune police) 3 दिवसांपूर्वी ईडीला यासंदर्भातील कागदपत्र पाठवली होती. त्यानुसार या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी तुकाराम सुपे, अश्विन कुमार, अभिषेक सावरीकर, सुखदेव डेरे, सौरभ त्रिपाठी यासह जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख, जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रीतिष देशमुख यांची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
काय आहे टीईटी घोटाळा?
2019-2020 या काळात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पुणे सायबर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्यात 7 हजार 880 उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचं उघड झालंय. म्हणजेच पात्र नसूनही हे उमेदवार शिक्षक बनले. आता या सर्व शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना नोकरीवरून हटवण्यात येणार आहे. अशा बोगस शिक्षकांची यादीही परीक्षा परीषदेने नुकतीच जाहीर केली आहे.
आरोपी कोण कोण?
टीईटी घोटाळ्यात पुणे पोलिसांकडून शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक झाली आहे. तसेच शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव ढेरे, जीए टेक्नोलॉजी कंपनीचे प्रमुख प्रीतेष देशमुख आदींवर कारवाई करण्यात आली आली आहे.
अब्दुल सत्तारांचं कनेक्शन काय?
पुणे पोलिसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी ज्या बोगस शिक्षकांची यादी पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे, त्यात औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नावही आले आहे. त्यामुळे पात्र नसतानाही सत्तार यांच्या मुलीने शिक्षकाची नोकरी केल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीतून उघड झाले आहे. एवढच नाही तर 2017 पासून त्यांनी नोकरी करून पगार उचलल्याचेही समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. सत्तार यांच्या तीन मुलींची नावं या घोटाळ्यात असल्याचं निष्पन्न झालंय. तर दोन मुलांचाही यात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. आता या प्रकरणी ईडी मार्फत चौकशी केली जातेय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार अब्दुल सत्तारांच्या पाठिशी उभे राहते का, याकडे सर्व विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहे.