‘राजपुत्र अमित ठाकरे समोर असल्याने दबाव, पण…’, ठाकरे गटाचे माहीमचे उमेदवार महेश सावंत काय म्हणाले?
माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवत असल्याने या जागेबाबतचं महत्त्व जास्त वाढलं आहे. या मतदारसंघात ठाकरे गटातून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आज महेश सावंत यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली.
मनसेकडून माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला आहे. सदा सरवणकर हे माहीमचे विद्यमान आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्यादा दावा केला. या मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून विनंती केली जात आहे. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्या दुहेरी लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“मला आत्मविश्वास आहे की, मी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. राजपुत्र समोर असल्याने दबाव असणारच आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पण मी जनतेची कामे करणारा आहे. त्यामुळे लोक मला मतदान करतील हा माझा विश्वास आहे”, असा दावा महेश सावंत यांनी केला. “अमित ठाकरे हे मोठे नेते आहेत. ते काहीही बोलू शकतात. पण सदा सरवणकर हे कच्चे खिलाडी नाहीत. ते माघार घेतील असं वाटत नाही. मी जिंकलो तर शिवाजी पीर्कातून धूळधाण आणि दादरच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लावणार”, अशी देखील प्रतिक्रिया महेश सावंत यांनी दिली.
“मनसेकडे 2019 मध्ये वरळीत उमेदवारच नव्हता. त्यामुळे त्यांनी अदित्य ठाकरे यांच्यासमोर उमेदवार दिला नाही. आताही संदीप देशपांडे उमेदवार दिला आहे, जो स्वतः माहीमचा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही राज ठाकरेंना सांगितलं नव्हतं की त्यांनी अदित्य ठाकरे यांच्यासमोर उमेदवार देऊ नये. मनसेकडे उमेदवार नव्हता म्हणून उमेदवार दिला नाही. तसं नसतं तर आदित्य ठाकरे आत्ताही वरळीतून उभे आहेत, मग आता का उमेदवार दिला?”, असा सवाल महेश सावंत यांनी केला.
51 ठिकाणी धनुष्यबाण विरुद्ध मशाल लढत
दरम्यान, लोकसभेनंतर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना 50हून अधिक ठिकाणी आहे. शिंदेंची शिवसेना 78 जागांवर लढतेय आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं 96 जागांवर उमेदवार दिले आहेत, आणि 51 ठिकाणी धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी थेट लढत आहे. तर धनुष्यबाणावरुन कन्फ्युज करण्यासाठी असा सामना भाजपनंच रचलाय, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ज्या 51 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आहे, त्यातील प्रमुख लढती आपण जाणून घेऊयात.
- कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे
- माहीम-सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत
- दिंडोशी -संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू
- महाड -भरतशेठ गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप
- कुडाळ-निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक
- दापोली -योगेश कदम विरुद्ध संजय कदम
- सावंतवाडी -दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली
- सिल्लोड -अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर
- औरंगाबाद पश्चिम -संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे
- कळमनुरी संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे
- परांडा -तानाजी सावंत विरुद्ध राहुल ज्ञानेश्वर पाटील
- नांदगाव – सुहास कांदें विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश धात्रक मैदानात आहेत
लोकसभा निवडणुकीत 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध अशी लढाई आहे. त्यापैकी 7 लोकसभा मतदारसंघात शिंदेंचे खासदार जिंकले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार निवडून आले. त्यामुळे लोकसभेतच शिवसेना कोणाची याचा फैसला झाला, असं मुख्यमंत्री शिंदेंनी दसऱ्याच्या मेळाव्यात म्हटलं होतं.
थेट मुकाबल्यात लोकसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा एक जागा शिंदेंनी अधिक जिंकली. आता तब्बल 51 ठिकाणी समोरासमोर लढत आहेत. त्यामुळे फुटीची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत आहे की शिंदेंनी आपल्या कामाची छाप उमटवलीय, याचा फैसला 20 तारखेला मतदानाच्या दिवशी होईल. आता खरी शिवसेना कोणाची याचा निकाल 23 तारखेलाच स्पष्ट होईल.