वडिलांना मदत करण्यासाठी गेला, पण पुन्हा कधीच परतला नाही, चिमुकल्यासोबत काय घडले?
वडील लाँड्रीचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सध्या शाळेला उन्हाळी सुट्टी असल्याने 13 वर्षाचा मुलगा वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला गेला.
सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : कल्याणमध्ये काळीड पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांना कामात मदत करणे एका चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. इस्त्रीचे कपडे द्यायला गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा सहाव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिम गांधारे रिद्धी सिद्धी सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. मयत चिमुकला इमारतीजवळ राहणाऱ्या लॉन्ड्री वाल्याचा मुलगा असून, इस्त्रीचे कपडे देवून परत येत असताना ही घटना घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सोसायटीमधील लिफ्ट यंत्रणा आणि त्याचे मेंटेनन्स हा मुद्दा समोर आला आहे.
इस्त्रीचे कपडे देण्यासाठी गेला तो परतलाच नाही
कनोजिया यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. आपल्या वडिलांना मदत व्हावी म्हणून चिमुकला इस्त्रीचे कपडे देण्यासाठी इमारतीत गेला, पण तो पुन्हा कधी परत आलाच नाही. कारण लिफ्टने त्याचा घात केला अन् थेट त्याला मृत्यूने कवटाळले. या घटनेमुळे कनोजिया कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात मुलाच्या दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
काय घडले नेमके?
कल्याण पश्चिम गांधारी परिसरात सात मजल्याची रिद्धी सिद्धी सोसायटी आहे. इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतीत या मुलाचे वडील लाँड्रीचा व्यवसाय करतात. रिद्धी सिद्धी इमारतीत कपडे देण्यासाठी मुलगा आला होता, पण लिफ्ट मध्येच बंद पडली. आता बाहेर कसं निघायचं हे त्याला कळलच नाही. निघायचा प्रयत्न करत असताना तो सहाव्या माळ्यावरून पडला आणी थेट लिफ्टच्या डकमध्ये कोसळला. मुलगा अजून आला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. शोधाशोध केल्यानंतर धक्कादायक अवस्थेत मुलगा सापडला. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे.