उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आले, उबेर बुक केली, केवळ दोन लाखांसाठी निघृण कृत्य, सुन्न करणारी घटना
दोन दिवसांपूर्वी एका उबेर चालकाचा मृतदेह आढळल्याची बातमी समोर आली होती. पण त्या चालकाची गाडी सापडली नव्हती. पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा सखोल तपास करत तीन जणांना उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण (ठाणे) : दोन दिवसांपूर्वी एका उबेर चालकाचा मृतदेह आढळल्याची बातमी समोर आली होती. पण त्या चालकाची गाडी सापडली नव्हती. पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा सखोल तपास करत तीन जणांना उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी कार चोरण्यासाठी उबेर चालकाची निघृण हत्याचं केल्याचं उघड झालं आहे. आरोपींनी कसाऱ्याजवळ चालकाची हत्या केली. त्यानंतर ते कार घेऊन उत्तर प्रदेशात निघून गेले होते. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
आधी कारची माहिती मिळाली, नंतर तपासाचे चक्र फिरले
कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात 3 ऑगस्टला एक उबेर कार आणि त्याचा ड्रायव्हर अमृत गावंडे हा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. उबेर चालक नवी मुंबईत वास्तव्यास होता. पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. मात्र उबेर कारमध्ये असलेल्या फास्टटॅगमुळे संबंधित कार उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले.
पोलिसांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले
कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी जाधव यांच्या मागदर्शनाखाली चार पोलिसांचे तपास पथक तयार करण्यात आले. कार नाशिकसाठी बूक करण्यात आली होती. पोलिसांनी महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासले. यादरम्यान 1 ऑगस्टच्या रात्री पडघा टोलनाका क्रॉस करताना तीच उबेर कार दिसून आली. नाशिकला असलेल्या टोलनाक्यातही कार पुन्हा दिसून आली. मात्र या दोन्ही टोलनाक्याच्या प्रवासाचे अंतर तीन तास दाखवित होते. पोलिसांसाठी हा आश्चर्याचा विषय होता. कारण हे अंतर केवळ दीड तासाचे आहे.
आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक
गाडी कोणत्या मोबाईल नंबरहून बूक झाली ही बाब समोर आली. हा नंबर उत्तर प्रदेशातील भदोई येथील राहूल कुमार गौतम याचा होता. पोलीस अधिकारी डी. ढोले यांचे एक पथक भदोई येथे पोहचले. पोलिसांनी राहूलकुमार गाौतम आणि धर्मेद्र कुमार गौतम या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. इतकेच नाही तर या प्रकरणी अमन हरीशचंद्र गौतम यालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरातील अन्य तीन आरोपी फरार आहेत.
तपासात धक्कादायक माहिती उघड
याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला. आरोपी राहूलकुमार गौतम हा ओला चालक आहे. तो डोंबिवलीतील मानपाडा भागात राहत होता. तो उत्तर प्रदेशला गेला. तिथे त्याने कार चोरीचा कट रचला. त्यानंतर सर्व आरोपी 1 ऑगस्टला कल्याणला पोहचले. जेवण करुन चोरीच्या उद्देशाने कार बूक करण्यात आली. पडघा आणि नाशिक दरम्यान कारचालक अमृत गावंडे याची निर्घृण हत्या करण्यात आली. कार घेऊन हे सगळे पसार झाले.
आरोपींना कार विकून दोन लाख रुपये मिळणार होते. अमन गौतम हा गॅरेज चालक आहे जो चोरी केलेली कार विकणार होता. हत्या करण्यात आलेला उबेर चालकाचे कुटुंब आता उघड्यावर पडले आहे. त्याला पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या निर्घृण हत्या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : बाई बंदुकीचा नाद बरा नाही, फोटो काढायला गेली नववधू, थेट रक्ताच्या थारोळ्यात