‘जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाची कलमं लावा’, केतकी चितळेचा गंभीर आरोप
ठाण्यातील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची कलमं लावावी, अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळेने केलीय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केलीय. चित्रपटगृहात जावून एका प्रेक्षकाला मारहाण करण्याच्या आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड दोन दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करण्यासाठी ठाण्याच्या विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये गेले होते. त्यांनी ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडला होता. त्यांनी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढलं होतं. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. ही मारहाण आव्हाडांसोबत गेलेल्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आव्हाडांसह अनेकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण जितेंद्र आव्हाडांच्या या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलाय. या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने देखील उडी घेतलीय.
ठाण्यातील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे. केतकीच्या वकिलांनी पोलिसांना तसं पत्रदेखील पाठवलं आहे.
“जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी जे कलम लावण्यात आले आहेत ते लगेच जामीन मिळतील असे कलम लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही. विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं”, असा आरोप केतकी चितळेने केला आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावावं, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.
“सामूहिकरित्या हा हल्ला झालाय. त्यामुळे एक कट रचला गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे विनयभंगाचं कलम पोलिसांनी का लावलं नाही?”, असं केतकीच्या वकिलांनी पोलिसांना पत्राद्वारे विचारलं आहे.
जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा कलम लावण्यात यावा आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केतकीकडून पत्राद्वारे करण्यात आलीय.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केलीय. ठाणे पोलीस जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवत आहेत. तसेच विवियाना मॉलचे मॅनेजर आणि संबंधित प्रेक्षकाचा देखील पोलिसांकडून जबाब नोंदवला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.