Thane Bandh : ऊठ मऱ्हाठ्या ऊठ, आता पेटून ऊठ… ठाणे बंदला मोठा प्रतिसाद; बंदमुळे चाकरमान्यांचे हाल
मराठा आरक्षणासाठी आज सर्व पक्षीय ठाणे बंद पुकारण्यात आला आहे. मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
ठाणे | 11 सप्टेंबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज ठाण्यात सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाण्यातील सर्व दुकाने, मॉल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला आहे. रस्त्यावरील वाहतूकही तुरळ सुरू आहे. अनेकांनी रिक्षा, टॅक्सी आज रस्त्यावर उतरवल्या नाहीत. त्यामुळे चाकरमान्यांचे स्टेशनला आणि नातेवाईकांकडे जाताना हाल होत आहे. ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाक्यानाक्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ठाण्यातील माजीवाडा जंक्शन या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटीलसह मराठा समन्वयकांनी खासगी वाहने, रिक्षा, परिवहन बसेस तसेच आस्थापनांना विनंती करत बंद करण्यास सांगितले. कृष्णा पाटील बसेस आणि रिक्षा बंद करत असल्याने राबोडी पोलिसांनी पाटील यांच्यासह मराठा समन्वयकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. वाहने बंद करण्यात येत असल्याने माजीवाडा जंक्शन आणि मुंबई ते नाशिकला जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
विद्यार्थ्यांचे हाल
ठाणे बंदमुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना स्टेशनला जायला रिक्षा मिळत नाहीये. गृहिणींनाही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे शहरातील बसेस सुरू आहेत. मात्र, बस आणि एसटीला प्रचंड गर्दी होत असल्याने त्यातून प्रवास करणंही कठीण झालं आहे.
मनसेची बॅनरबाजी
या बंदममध्ये मनसेनेही भाग घेतला. मनसेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून बंद पाळण्याचं आवाहन नागरिकांना केलं. मनसेनेही रस्त्यावरून धावणाऱ्या खासगी गाड्या आणि रिक्षा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच दुकानेही बंद करण्यात आली. नौपाड्यात मनसेने मोठे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. ऊठ मराठ्या ऊठ, आता पेटून ऊठ असे बॅनर्स मनसेने लावले आहेत. मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि सुशांत डोंबे यांनी हे बॅनर्स लावून बंदची हाक दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनाच विचारा
दरम्यान, ठाणे बंदवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ठाणे बंदबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा. मुख्यमंत्री काल जी-20ला होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेवर आहेत ना. जंत्र, तंत्र, मंत्र हेच करत आलेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.