या शहरात एकच शिवसेना असेल!; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काय सांगितलं
अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.
अंबरनाथ : अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता आहे. यापुढे अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय. अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यापुढे अंबरनाथ शहरात एकच शिवसेना असेल. पूर्वीप्रमाणे सगळे एकत्र काम करतील अशी प्रतिक्रिया दिली.
काय आहे स्थानिक राजकारण?
राज्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर अंबरनाथ शहरातील आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा गट पहिल्या दिवसापासून शिंदे यांच्यासोबत होता. मात्र आमदार किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट असल्यामुळे वाळेकर गट ठाकरे गटातच होता. काही दिवसांपूर्वी काही पडद्यामागील घडामोडी घडल्या. त्यानंतर अचानक अरविंद वाळेकर आणि त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचं स्वतःच जाहीर केलं होतं.
मात्र त्यांचे सर्व समर्थक ठाकरे गटातच थांबले होते. इतकंच नव्हे, वाळेकर यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले श्रीनिवास वाल्मिकी यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना थेट शहरप्रमुख पद देण्यात आलं होतं. वाळेकर गटाच्या प्रवेशाला आमदार किणीकर गटाचा विरोध असल्याचीही चर्चा होती. मात्र अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी या सर्वांशी संवाद साधला आणि वाळेकर गट सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत आला.
पूर्वी आलेले पदाधिकारी नाराज?
दरम्यान, वाळेकर गट शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची कुणकुण लागताच पहिल्या दिवसापासून शिंदेंसोबत आलेले आणि वाळेकर यांचं नेतृत्त्व मान्य नसलेले काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज झाले. या पदाधिकाऱ्यांशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या फार्म हाऊसवर संवाद साधला. यावेळी आम्ही वाळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार नाही, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यावर ‘मी आहे ना?’ असं म्हणत खासदारांनी या सर्वांना आश्वस्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.