ठाणे: ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची (shivsena-ncp) युती होण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील कलगीतुरा थांबताना दिसत नाही. एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असतानाच ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के हे शिवसेना-भाजप युती ही नैसर्गिक युती असल्याचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालते की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचाररणीवर? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे (anand paranjpe) यांनी लागावला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला.
माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला होता. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती होती, असं म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला.
काल ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची महासभा संपन्न झाली. त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे त्यांच्यातील अहंपणा आणि अहंकार आजही त्यांच्यातून गेलेला नाही. खरंतर त्यांची महापौरपदाची अडीच वर्षांची कारकिर्द आज संपली आहे. कालदेखील महासभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढत असताना शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असल्याचे सांगत स्वबळाचा नारा दिला. आपणाला तर आश्चर्य वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकीकडे म्हणतात की 25 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. सापाला आम्ही दूध पाजले आणि ठाण्याचे महापौर हे सेना-भाजपची नैसर्गिक युती आहे अन् हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा प्रकारचे भाष्य करीत आहेत. त्यामुळे “ठाण्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालते की शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, विद्यमान महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते”, याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे करायला हवा, असं त्यांनी म्हटलं आहे.
महापौरांनी गुरुवारी स्वबळाचा नारा दिला. आम्ही त्याचे स्वागतच करतो. किंबहुना, त्यांना शुभेच्छाच देतो. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, जिथे शक्य आहे तिथे महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने महाविकास आघाडी ठाण्यात गठीत झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. आमचादेखील तोच प्रयत्न आहे. उद्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तर आम्ही त्याचे स्वागत करु. नशिबाने नरेश म्हस्के असे म्हणाले नाहीत की, 142 पैकी 142 नगरसेवक आमचेच निवडून येतील. कारण, त्यांचा चाणक्याचा कलियुगातील नारद कधी झाला, हे त्यांना समजलेलेच नाही, असा टोलाही परांजपे यांनी लगावला आहे.
संबंधित बातम्या:
चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई
VIDEO | राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला चोप
TMC Corporator : ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, उद्यापासून प्रशासकीय राजवट सुरू