Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते हा वेडा माणूस, अविनाश जाधव यांची सडकून टीका; टोलवरून वाद पेटणार
मनसे नेते राज ठाकरे यांनी टोलनाके जाळून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशन गाठून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता...
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 ऑक्टोबर 2023 : टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते आमनेसामने आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी चिथावणीखोर विधान केल्याचा सदावर्ते यांचा दावा आहे. तसेच आपल्याला राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे. मी कुणालाही घाबरत नसल्याचंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तर सदावर्ते यांच्या या विधानावर मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदावर्ते वेडा माणूस आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी मला ते योग्य वाटत नाहीत, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे. तर सदावर्ते यांची प्रॅक्टिस बंद झाली आहे. त्यामुळे सदावर्ते काहीही करत आहेत. त्यांना गांभीर्याने घेऊ नका. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
कोण सदावर्ते?
यावेळी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. कोण सदावर्ते? अलिकडे आऊट सोर्सिंगचा जमाना आहे. भाजपने कॉन्ट्रॅक्टवर घेतलेली ही माणसं आहेत. सदावर्ते असतील किंवा भिडे ही सगळी कॉन्ट्रॅक्ट वरची माणसं आहेत, अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
सदावर्ते काय म्हणाले?
गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दिली. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी टोलनाके जाळू असं चिथावणीखोर विधान केल्याचं सदावर्ते यांचं म्हणणं आहे. त्यानंतर सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना घाबरणार नसल्याचं सांगितलं.
राज ठाकरे यांची पिल्लावळ मला फोन करून धमकी देत आहे. मला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण मी कुणालाही घाबरणार नाही. तुमच्या लोकांच्या धमक्यांना भीक घालणार नाही. राज ठाकरे यांची दादागिरी चालणारनाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.