माझ्या पोराला गोळ्या घालून मारलं, आम्हालाही मारा; अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश

| Updated on: Sep 23, 2024 | 8:11 PM

तळोजा कारागृहातून बदलापूरला ट्रान्झिट रिमांडला नेतांना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर उलट गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेतली होती. त्याने 3 ते 4 राऊंड फायरिंग केली आहे. या गोळीबारात एक पोलीस जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

माझ्या पोराला गोळ्या घालून मारलं, आम्हालाही मारा; अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश
akshay shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने या चकमकीत अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, या घटनेवर अक्षयच्या आईवडिलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझ्या मुलाला मारून टाकण्यात आलं. त्याला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल अक्षयच्या आईने केला आहे. अक्षयच्या आईवडिलांनी या प्रकरणावरच संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आईवडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याच्या आईने तर थेट पोलिसांवर आरोप केला आहे. माझ्या पोराची वाट बघतेय, माझा पोरा असं करूच शकत नाही. माझा पोरगा असा नाही. दुसऱ्यानेच गुन्हा केला. आरोप माझ्या पोरावर दाखल केला. माझ्या पोरानं असं काही केलं असतं तर कामावर गेला नसता. माझा पोरगा भोळा आहे. त्याने असं काही केलं नाही. माझ्या पोराला गोळी घालून मारून टाकलं. आम्हाला मारून टाका आम्ही येतो. कोणत्या हॉस्पिटलला टाकलं तिथेच येतो, आम्हालाही मारा, असं अक्षयच्या आईने म्हटलं आहे.

फटाका फोडू शकत नाही

माझा पोरगा फटका फोडू शकत नाही. तो बंदूक काय चालवेल? माझा पोरगा गाड्याना घाबरायचा. आम्ही रोजचं काम करून जगणारे लोकं आहोत. आम्हीही आता जगणार नाही. आमच्या पोरासोबतच जाणार आहोत, असं त्याची आई म्हणाली.

न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!

दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सटरफटर समोर…

तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही बदलापूर प्रकरणातील हरामखोर आरोपीने स्वत:ला गोळी घालून घेतल्याची बातमी आताच समजली. सरकारने तात्काळ या प्रकरणात जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी केल्या तरीही बदलापूर प्रकरणात आकांडतांडव करणारे उबाठाचे सटरफटर हे आता या प्रकरणात आरोपीला गोवण्यात येतयं म्हणून कांगावा करताहेत. गोळी त्यानेच मारली की आणि कुणी मारली वगैरे वगैरे…. वा रे वाह….. काय म्हणावं आता या सटरफटरांसमोर सरडा सुद्धा आत्महत्या करेल हो, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.