बदलापूरच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची अज्ञातांकडून तोडफोड
बदलापूरच्या लहान मुलींच्या लैगिंक शोषणाचा आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला आज कोर्टात हजर केलं होतं. या दरम्यान अशी ही माहिती समोर येत आहे की, काही अज्ञात लोकांनी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे.
बदलापुरातील एका शाळेत झालेल्या लहान मुलींच्या लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. अक्षय शिंदे हा शाळेचाच कर्मचारी असून आरोपीने शाळेतील दोन मुलींवर लैंगिक शोषण केले होते. या घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान काही आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर जमा होत रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन सुरु केले होते. ज्यामुळे जवळपास ८ ते ९ तास रेल्वे सेवा बंद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. सर्व आंदोलकांना रेल्वे स्थानकापासून दूर केले गेले त्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती.
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी देण्याची आंदोलकांची मागणी आहे. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टाला विनंती केली होती की, आरोपीने आणखी काही मुलींवर अशाच प्रकारे शोषण केले आहे याची चौकशी करायची आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का याचा देखील शोध घ्यायचा आहे. त्यावर कोर्टाने आरोपाला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूर घटनेचे पडसाद दिल्लीत देखील पाहायला मिळाले. केंद्रीय बालहक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
बदलापूर आंदोलनाच्या दरम्यान काही समाजकंठकांनी गैरफायदा घेतल्याचा दावा देखील पोलीस सुत्रांनी केला आहे. पोलिसाना काही कॉल डिटेल्सची माहिती हाती लागली आहे. पोलिसांनी हिंसक आंदोलनामागे कोण होतं याचा तपास करण्यासाठी पथक नेमलं आहे. बदलापूरच्या घटनेवर माहिती देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.