‘त्या’ जखमा… मुख्याध्यापिकेच्या दाव्याने बदलापूरकरांचा संताप, पालकांनी काय दिली माहिती
बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीने उद्या, 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. तर आता या दोन मुलींना झालेल्या जखमांबाबत मुख्याध्यापिकेच्या दाव्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन बालिकांच्या लैंगिंक अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर राज्य हादरले. त्याविरोधात बदलापूरकरांनी तीव्र आंदोलन केले. रास्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलन केले. संतप्त जमावाने शाळेत घुसून तोडफोड केली. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने उद्या, 4 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. तर या घटनेत दोन मुलींना झालेल्या जखमांबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या दाव्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
त्या जखमा सायकलमुळे
बदलापूरमधील एका शाळेत दोन बालिकांवर कथित लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुख्याध्यापिकेने केलेला संतापजनक दावा चर्चेचा विषय बनला आहे. संबंधित शाळेतील मुख्याध्यापिकेने मुलींच्या जखमांबाबत “सायकल चालविताना झालेली असावी,” असे वक्तव्य केले आहे, अशी माहिती एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यात पालकांनी दिलेल्या माहिती आधारे हे वृत्त देण्यात आले आहे.
पालकांनी काय केला दावा
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 13 ऑगस्टला सफाई कामगाराने मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यातील एका मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर तिच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे समोर आले. 16 ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले. मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी अथवा शाळेबाहेर काही घडले असावे, असा दावा केला आणि आरोप फेटाळून लावले. पालक याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले. पण तिथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. साधी तक्रार दाखल करुन घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास लावले.
दबाव आल्यानंतर गुन्हा दाखल
पीडित मुलींच्या पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर दुर्लक्ष आणि छळाचा आरोप केला आहे. तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ तासांचा अवधी घेतला, मात्र स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र बंदची 24 ऑगस्ट रोजी घोषणा केली आहे.
गृहखात्याला कान पिचक्या
जे बदलापूरला घडलं. ते अत्यंत निषेधार्ह आहे. दुसरीकडे चिंताजनक आहे. दोन लहान मुलींवर अत्याचार झालं आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात होतो हे धक्कादायक आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया बदलापूरच नाही तर अनेक ठिकाणी उमटत आहे. बदलापूरला जो प्रकार झाला त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्वांनी मागणी केली आहे. सरकारने अशा प्रसंगाना आवर घालण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. गृहखात्याच्या यंत्रणेने सतर्क राहिलं पाहिजे. जिथे गरज आहे तिथे कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.