Rain Effect | पावसामुळे मोठी दुर्घटना, चौथ्या ते पहिल्या मजल्यापर्यंतच्या सर्व बाल्कनी खाली कोसळल्या
उल्हासनगरात चार मजली इमारतीच्या बाल्कनी कोसळल्या आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील रामायण नगरमध्ये द्वारकाधाम इमारतीच्या बाल्कनी कोसळल्या आहेत.
उल्हासनगर | 20 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा ओघ अजूनही सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. याशिवाय बुधवारी मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर महाराष्ट्राची गुरुवारची पहाट एक अतिशय वाईट घटनेमुळे हादरली. कारण रायगडमधील इर्साळवाडी हे गाव दरडीखाली जमीनदोस्त झालं. त्यामुळे अनेक लोक या दरडीत चिरडले गेले. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचं मन सुन्न झालं. ही घटना ताजी असताना मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमध्ये देखील एक अनपेक्षित घटना घडलीय.
उल्हासनगरात चार मजली इमारतीच्या बाल्कनी कोसळल्या आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील रामायण नगरमध्ये द्वारकाधाम इमारतीच्या बाल्कनी कोसळल्या आहेत. चौथ्या मजल्यापासून सर्व बाल्कनी खाली कोसळल्या आहेत. उल्हासनगर महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. या इमारतीमध्ये वॉचमनचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. बाल्कनी खाली उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.
मीरा भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला
विशेष म्हणजे आज सकाळी भाईंदर पूर्व येथील नवकिर्ती सोसायटीच्या पहिल्या मजल्याचा पुढचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली होती. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. ही इमारतदेखील आधीच रिकामी होती. पण इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकानं सुरु होती.
मीरा भाईंदर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून आधीच नोटीस दिली होती. ही इमारत रिकामी करण्यात आली होती. खाली काही दुकाने आहेत, जी सुरू होती, इमारतीखाली उभा असलेला एक रिक्षाचालकही जखमी झाला आहे, आणि आणखी दोन जण जखमी झाले आहेत. सध्या तीन जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्यात पुढचे 24 तास महत्त्वाचे
ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यासाठी उद्याच्या दिवसासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनापुढील आव्हान वाढलं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना शक्यतो घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.