कल्याण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज (11 जुलै) कल्याण डोंबिवली शहराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला. कल्याण डोंबिवली शहराच्या विकासावर बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचेच खासदार, पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते लोकांची सेवा कधी करणार? असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला (BJP Leader Pravin Darekar slams Shivsena).
“कल्याण डोंबिवलीत सत्ता शिवसेनेची आहे. शहराचा खासदार, शिवसेनेचा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरीही आता जर विकास झाला नाही तर लोकांनी भरभरून मते दिली आहेत. त्यांची सेवा कधी करणार? विकासासाठी भाजपाचे सहकार्य कायम आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले (BJP Leader Pravin Darekar slams Shivsena).
“इतर ठिकाणी लस उपलब्ध होतात. इतर महापालिका 25 ते 30 हजार लस उपलब्ध करीत आहेत. त्या तुलनेत इथे लसीकरण अत्यल्प आहे. एकीकडे खाजगी लसीकरण सुरू आहे. तर नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने लस खरेदी केली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.
“सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु व्हाव्यात यासाठी रेल्वे आंदोलन करावे लागले तर आंदोलन करु”, असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. “हातावर पोट भरणारा कर्मचारी वर्ग कर्जत-कसारा ठाण्यापर्यंत राहतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊ”, असंदेखील ते म्हणाले.
हेही वाचा : मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी धरणावर, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु