Dahihandi : मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, टेंभी नाका परिसरातल्या शिंदे गटाच्या दहीहंडीत पोस्टर्स; भाजपाच्या नेत्यांचेही लावले फलक
टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी होत असली तरी याठिकाणी भाजपाच्या नेत्यांचे भले मोठे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. या माध्यमातून राजकीय शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
ठाणे : मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशाप्रकारचे फलक लावून टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची (Eknath Shinde) दहीहंडी साजरी होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचारदेखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत. टेंभी नाका येथील दहीहंडीला (Tembhi Naka dahihandi) यावर्षी खास महत्त्व आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली दहीहंडीचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले आहे. मात्र यावर्षी पोस्टरवरचे चेहरे बदलले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पोस्टर्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दहीहंडीच्या ठिकाणी हा भाजपाचा कार्यक्रम असल्याचे भासत आहे, अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत.
दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ
मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मतदानाच्या वेळी शिव्या द्यायच्या आणि निवडणुकीनंतर त्यांच्याबरोबरच आघाडी करायची, अशाप्रकारचे पोस्टर्स दहीहंडीच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या दहीहंडीच्या उत्सवाला आता सुरुवात झाली आहे. विविध गोविंदा पथके सहभागी होत आहेत. मानाची दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ लागलेली पाहायला मिळणार आहे. मोठे स्टेज याठिकाणी उभारण्यात आले आहे. गोविंदा पथकांसह सामान्य नागरिकांची गर्दी याठिकाणी दिसून येत आहे.
टेंभी नाका – दहीहंडी
दहीहंडी शिंदे गटाची की भाजपाची?
टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी होत असली तरी याठिकाणी भाजपाच्या नेत्यांचे भले मोठे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. या माध्यमातून राजकीय शक्तीप्रदर्शन केले जात आहे. आतापर्यंत शिवसेनेतर्फे ही दहीहंडी साजरी होत होती. मात्र शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे येथून शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. दरम्यान, ही दहीहंडी शिंदे गटाची की भाजपाची, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मग भाजपा करणार का, असा सवाल आणि चर्चाही ऐकायला मिळत आहे.