बदलापुरात शिवसेना-भाजपात पुन्हा तणाव, भाजप आमदार किसन कथोरेंचा शिवसेनेला थेट इशारा
बदलापुरात महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न पडावा अशा घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण बदलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढला आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी यावरुन शिवसेनेला थेट इशारा दिला आहे.
बदलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना भाजपात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. “आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ. ते उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवेश करतात, मी मुख्यमंत्र्यांकडे करून घेईन”, असा थेट इशाराच भाजपा आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बंटी म्हसकर यांनी आमदार किसन कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरेंवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या दोघांचं अजूनही मनोमिलन झालेलं नसताना आता वामन म्हात्रे यांनी कथोरेंचा बालेकिल्ला असलेल्या बदलापूर गावातील भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करून घेतला. यानंतर कथोरे यांनीही शिवसेनेला थेट इशारा दिला.
हेमंत चतुरे यांनी निवडणुकीत बंडखोरी केल्याने त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना आता कुठेही थारा नसल्यानं ते शिवसेनेत गेले, असं कथोरे म्हणाले. तसेच आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ, ते उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवेश करतात, मी मुख्यमंत्र्यांकडे करून घेईन, असं म्हणत कथोरे यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. त्यामुळे आता बदलापुरात शिवसेना आणि भाजपात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
कपिल पाटील यांचं चर्चेतलं विधान
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे आयोजित आगरी महोत्सवाच्या कार्यक्रमात माजी खासदार कपिल पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. “एका बरणीत लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या एकत्र ठेवा, त्या शांततेने राहतात. पण कुणीतरी येतो आणि ती बरणी हलवून निघून जातो. त्यानंतर मात्र या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात. त्यामुळे ही बरणी हलवणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे”, असा टोला भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरच्या आगरी महोत्सवात लगावला. त्यांचं हे वक्तव्य नेमकं कुणाला टोला देणारं होतं? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कपिल पाटील यांनी आपलं हे वक्तव्य कुणालाही टोला देणारं नव्हतं, असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण विधानसभा निवडणुकीदरम्यान बदलापुरात महायुतीत घडलेल्या घडामोडींवरुनच ते बोलल्याची चर्चा होती. त्यानंतर आता किसन कथोरे यांनी उघडपणे शिवसेनेला इशारा दिला आहे. त्यामुळे आता बदलापूरच्या राजकारणात आगामी काळात काय काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.