‘…तर पळता भुई थोडी होईल’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा इशारा, पाहा नेमकं काय म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. त्यांची ठाण्यात आज सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिला आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला आज ठाण्यापासून सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांची ठाण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उघडपणे इशारा दिला आहे. “आम्हाला बोलायला लावू नका. बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे बरंच काही बोलायला आहे. आम्ही ते सर्व अजून सांभाळून ठेवलं आहे”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
“सत्तेची डोक्यात हवा गेली की लोकंदेखील बरोबर लक्षात ठेवतात. म्हणून आपला जन्म सत्तेसाठी झालेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कितीतरी वेळा सत्तेला लात मारली आहे. पण दुसरीकडे सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदडी तुडवले. सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायमचं दूर केलं त्यांना तुम्ही जवळ केलं”, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
“देवेंद्र फडणवीस यांनी मगाशी एक उदाहरण दिलं की, छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या काळात दगाबाजांना थारा देत नव्हते. दगाबाजी कुणी केली? कुणाला गद्दार म्हणताय, दगाबाज कोण? ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या मतदारांशी दगाबाजी कुणी केली? शिवसेना, भाजप युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी नेमका इशारा काय दिला?
“बाळासाहेब, हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवले, ज्या मतदारांनी निवडून दिलं, बहुमत दिलं, त्यांच्याशी दगाबाजी कुणी केली? आम्हीसुद्धा बोलू शकतो. आम्हालाही बोलता येतं. पण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यांनी काही गोष्टी शिकवल्या. आम्ही मर्यादा सोडून बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असं मानू नका. आमच्याकडे सगळं आहे. पण अजून ठेवलं आहे. काढायला लागलो तर पळता भुई थोडी होईल. तोंड लपवायला लागेल”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुख्यमंत्री आणखी काय-काय म्हणाले?
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं की शंभर टक्के राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. पण काय मिळवलं. बाळासाहेबांचा विचार आणि भूमिका घेऊन आपण पुढे निघालो, आपण वर्षभरापूर्वी आपल्यासोबत असलेले सर्व 50 आमदार 13 खासदारांनी निर्णय घेतला. त्यांनी कोणताही विचार केला नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“सत्तेतून बाहेर पडणारे आपण जगाच्या इतिहासातील पहिले लोकं आहोत. लोकं सत्तेकडे जातात. पण सत्तेतून पायउतार होणारे, मंत्रीपदी असणारे लोक, एकनाथ शिंदे बरोबर पायउतार झाले. त्यांना माहीत नव्हतं, मला कुणी विचारलं नाही की, काय होणार, काय मिळणार, काही नाही”, असं शिंदेंनी सांगितलं.
“जगाच्या इतिहासात असं कधी होणार नाही. पुढे काय वाढून ठेवलंय तेही माहिती नव्हतं. पण लढण्याचा निर्णय घेतला होता. लढून एक तर जिंकू किंवा शहीद होऊ. दोन पैकी एक. पण शेवटी जो निर्णय घेतला तो सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतला. या राज्यातल्या जनतेसाठी आपण निर्णय घेतला. स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेतला नाही”, असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
“देवेंद्र फडणवीस आज भाषणात म्हणाले की,जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलं आहे. अन्यायाविरुद्ध लढा. अन्यायाविरुद्ध पेटून उठा. अन्याय सहन करु नका, म्हणून आम्ही निर्णय घेतला”, असं शिंदे म्हणाले.
“मी मुख्यमंत्रीपद मिळेल, असा विचार कधी मनात धरलेला नव्हता. त्या काळात परिस्थिती तशी होती. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या सैनिकांचं खच्चिकरण होत होतं. केसेस लादल्या जात होत्या. तडीपार, मोक्का सारख्या कारवाया आपल्या पोरांवर होत होत्या. मग ही सत्ता काय उपयोगाची?”, असा सवाल शिंदेंनी केला. “या सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या आणि शिवसैनिकाच्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही याची काळजी हा एकनाथ शिंदे घेईल. सत्ता येते-जाते. आपला सत्तेसाठी जन्म झालेला नाही. पण सत्ता असताना असं काम करा की, तुम्ही सत्तेत नसताना देखील लोकं तुमच्यासाठी रस्त्यावर थांबली पाहिजे. सत्तेचा अमरपट्टा कुणीच घेऊन आलेलं नाही. पण आपल्या अधिकाऱ्यांचा वापर सर्वसामान्यांसाठी करा. माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो”, असं शिंदे म्हणाले.
“आम्ही काय केलं? बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. मग दगाबाज कोण आणि वफादार कोण हे जनतेने ठरवलं आहे. जनता सुज्ञ आहे. आम्ही जिथे जातो तिथे जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पाहिल्यानंतर समाधान वाटतं”, असं शिंदे म्हणाले.