ठाणे | 14 जानेवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी कोठारी बंधूंना शहीद केलं त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहेत. ज्यांनी रामाला नाकारलं, त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहेत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पण त्यांची चूक नाही. रामायणात मंथरेचं ऐकलं की काय हतं हे रामायणाने सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबतही एक मंथरा आहे. त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार? तिकडे राजा दशरथ तरी होते. ते पुण्यवान राजे होते. इथे तुम्ही मंथरा सोबत ठेवली, काय तुमचं होईल?, असा हल्लाच देवेंद्र फडणवीस यांनी चढवला.
ठाण्यातील आनंदनगर परिसरातील ठाणे महापालिका मैदानात परिसरात राम कथा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने ठाण्यात राम कथाच आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारसेवकांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांच्या वजनाने मशीद पडली असेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. ठाकरे यांच्या या टीकेचाही त्यांना खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले, फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. त्यांना सांगतो अरे जिसके साथ रामजी है, बाबरी मशीद तो छोटी है हिमालय पर्वत हिलाने की ताकद राम का सेवक रखता है. रामाच्या सेवकात ताकद आहे, तो हिमालय हलवू शकतो. या राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये. आमच्या नसानसात हिंदुत्व आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे वाघ होते. पण तुम्ही वाघ नाही. तुमच्यासोबतचा कोणीच वाघ नाही. तुमच्यासोबतचा एक नेता दाखवा. उद्धवजी एक नेता… जो अयोध्येत कारसेवेला ज्यावेळी ढाचा पडला तेव्हा तिथे उपस्थित होता. एक नेता दाखवा. आम्ही तर सर्वच होतो. आमचे आडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते, आमच्या कल्याण सिंह यांनी जे धैर्य दाखवलं… कल्याण सिंह यांचं सरकार गेलं, मध्यप्रदेशाचं सरकार गेलं. राजस्थानचं सरकार गेलं. आम्ही सांगितलं एका रामंदिरासाठी शंभर सरकारे घालवू. रामल्लला राहिले तर सरकारही येईल. मंदिर राहिलं तर सरकार येईल. म्हणून माझी चिंता करू नका, असा हल्ला फडणवीस यांनी चढवला.