डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा 12 वर, डीएनए चाचणी करुन ओळख पटवणार
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीतील अमुदान कंपनीत रासायनिक स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या स्फोटात १० मृतदेह सापडले असून २ जणांचे फक्त अवशेष सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात तीन कंपन्यातील 12 जण तेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. शोधमोहिमेत दहा जणांचा मृतदेह सापडले असून दोन जणांचे मानवी अवशेष सापडले आहेत. अमुदान कंपनी मधील 10, दत्त वर्ण कॉसमॉस कंपनी मधील 1 आणि सप्त वर्ण कंपनी मधील 1 असे 12 कामगार बेपत्ता होते.
अमुदान मधील 8, दत्त वर्ण कॉसमॉस कंपनी मधील 1 आणि सप्त वर्ण मधील 1 असे दहा कामगारांचा मृतदेह सापडले असून तीन जणांची ओळख पटली नाही. सात जणांचा मृतदेह आणि मानवी अवशेष यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे डीएनए सॅम्पल घेत ओळख पटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले जाणार आहेत.
रासायनिक कंपन्या इतर ठिकाणी हलवा
आठ वर्षापूर्वी डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. 26 मे 2016 रोजी या प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक लोकं जखमी झाले होते. या स्फोटामुळे तीन ते चार किलोमीटर परिसरातील लोकांचं मोठं नुकसान देखील झालं होतं. पहिल्या रासायनिक स्फोटात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पण कुणालाही भरपाई मिळाली नव्हती. आता भरपाई नाहीतर रासायनिक कंपन्या इतर ठिकाणी हलवून आमचा जीव वाचवा अशी मागणी डोंबिवलीकरांनी प्रशासनाकडे केली आहे.
कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात कंपनीच्या मालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच डोंबिवली आमुदान केमिकल कपंनी स्फोट प्रकरणात मालती मेहता यांना अटक करण्यात आली होती. पण आज त्यांची चौकशीनंतर सुटका करण्यात आली. मानपाडा पोलीस ठाण्यात आमुदान कंपनीचे डायरेक्टर असलेल्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्यात आला आहे. मालती मेहता या नाशिकला देवदर्शनासाठी जात असताना गुन्हे शाखेने चौकशी साठी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीत त्यांचा कंपनीशी कुठला संबंध नसून पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या नावाने असल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले आहे.