बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
पुणे, लोणावळासह रायगडात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. दुसरीकडे बदलापूरमधील बारवी डॅमचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. सध्या बारवी डॅमची पातळी ६८.१५ मीटर इतकी आहे.
बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. एमआयडीसीकडून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाडच्या तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. बारवी धरणाची पाणीपातळी सध्या ६८.१५ मीटर इतकी आहे. पण ७२.६० मीटर इतकी पाणीपातळी गाठताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उल्हास नदीने गाठली धोक्याची पातळी
पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. उल्हास नदीच्या या पुराचं पाणी बदलापूर शहरात घुसलं असून अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहरात एनडीआरएफ सुद्धा तैनात करण्यात आली आहे. उल्हास नदीचं हे अक्राळ-विक्राळ रूप अनेक वर्षांनी बदलापूरकरांना पाहायला मिळत असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास बदलापूर शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे.
पावसाची अधून मधून विश्रांती
कल्याण, डोबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मधून मधून पाऊस विश्रांती घेत असल्याने पाण्याचा निचरा होत आहे. कल्याणच्या खाडी किनारी अडकलेल्या नागरिकांना केडीएमसीने बाहेर काढले आहे. 15 नागरिक घरात अडकले होते. केडीएमसी आणि अग्निशमन विभागाने बोटीच्या आधारे या लोकांना सुखरुप बाहेर काढले आहे. खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने केडीएमसीने वारंवार सूचना केल्या मात्र काही नागरिक घराबाहेर पडले नाहीत त्यामुळे घरातच अडकले होते. सध्या हा परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला आहे. कल्याण परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून अनेक सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा देखील होत आहे.
कल्याण खाडीची पातळी वाढली
कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्याने रेतीबंदर परिसर जलमय झाला आहे. खाडी किनारी राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. रेतीबंदर परिसरात असलेल्या अनेक तबेल्यांमध्ये पाणी गेल्याने गायी आणि म्हशींना सुखरुप बाहेर काढले जात आहे.
वालधुनी नदीची पातळी वाढल्याने वालधुनी नदीच्या काठावर असलेल्या शिवाजीनगर, अशोक नगर, अंबिका नगर परिसरातील घरांमध्ये पाणी गेले आहे. पाणी शिरल्याने लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.