ठाणे : ठाणे-नाशिक महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले. या ठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यात वाहतूक पोलीस रस्त्यावर मनमर्जीप्रमाणे कारवाई करतात. उभ्या रस्त्यावर मोठमोठे ट्रक थांबवतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या वाहतूक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी वाहन चालकाला तब्बल एक ते दीड तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागते. मात्र वाहतूक पोलिसांमुळे वाहतूक कोंडी होत असेल तर त्यांना जाब विचारणार तरी कोण ?
ठाणे-नाशिक महामार्गाची रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे ठाणे येथे कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी नाशिकवरून ठाण्याच्या दिशेने जात होते. मंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी दिसली. वाहतूक कोंडीत दादा भुसे यांना अडकावे लागले.
नेमकी ही वाहतूक कोंडी का झाली हे पाहण्यासाठी मंत्री दादा भुसे हे स्वत: आपल्या गाडीतून उतरले. दादा भुसे यांनी पाहणी केली. काही ट्रक या महामार्गावरती उभे असलेले दिसून आले. मंत्री दादा भुसे यांनी या ट्रक चालकांना ट्रक उभा का केला, अशी विचारणा केली. कारवाईसाठी पोलिसांनी या ट्रकच्या चाव्या काढून महामार्गावर उभ्या केल्या असल्याचे वाहन चालकांनी मंत्र्यांना सांगितले.
मग काय वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंत्री दादा भुसे हे चांगलेच संतापले. स्वतःही वाहतूक कोंडी सोडवत वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांना कारवाई आम्हाला सांगू नका. रस्त्यावर ट्राफिक झाली नाही पाहिजे. ट्राफिक आम्हाला चालणार नाही, असे सांगत कानउघडणी केली. सध्या मंत्री दादा भुसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.