ठाणे : महाराष्ट्रात 20 जून 2022 या दिवशी मोठा राजकीय भूकंप घडलेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री होते. त्यांनी शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष 10 अशा एकूण 50 आमदारांना घेऊन मोठं बंड पुकारलं होतं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आजच्याच दिवशी एकनाथ शिंदे आपल्या समर्थक सर्व आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला एका नामांकीत हॉटेलमध्ये अनेक दिवस थांबले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणलं होतं. या सर्व घडामोडींना थेटपणे सुरुवात ही 20 जूनपासून झाली होती. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालंय.
ठाकरे गटाकडून आजच्या दिवशी गद्दार दिवस म्हणून साजरा केला जातोय. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांकडून उत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत टीका केली जाते. उद्धव ठाकरे शिंदे गटाला वडिलांवरुनही टीका करतात. उद्धव ठाकरे यांच्या टीकांना उत्तर देण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांचे वडीलही राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी केक कापत ठाकरेंवर निशाणा साधलाय.
ठाण्यातील शिवसैनिकांनी स्वाभिमान दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आजच्याच दिवशी 2022 ला आपल्या 40 आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतला रवाना झाले होते आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. याचाच निषेध म्हणून आज राज्यभर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी तर्फे गद्दार दिवस साजरा केला जातोय.त्याचा विरोध करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या किसन नगर येथील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी एकत्र जमत स्वाभिमान दिवस साजरा केला. यावेळी फटाके फोडत आणि लाडू वाटून आनंदही व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांचे धाकटे बंधू नगरसेवक प्रकाश शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांनी केक कापत स्वाभिमान दिवस साजरा केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी असेच चांगले काम करा, असे म्हणत शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी ठाकरे गटाला प्रतिउत्तर दिले. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत. हा केलेला उठाव असून खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, असे प्रकाश शिंदे यावेळी म्हणाले.
आता एकनाथ शिंदे यांच्या वडिलांच्या या कृतीवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: याबाबत काही बोलतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.