‘घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की…’; अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितली आपबीती
डोंबिवलीत मोठी दुर्घटना घडली आहे. डोंबवली एमआयडी फेज 2 येथे असलेल्या एका कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठी हानी झाली आहे.
डोंबिवलीमधील कंपनीमध्ये आज दुपारी ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय. तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या या आगीवरती अग्निशामक दलाने नियंत्रण आणले आहे. मात्र रात्र झाल्याने अग्निशामक दल या ठिकाणी सर्च ऑपरेशन करू शकत नसल्याने रेस्क्यू करायचं काम थांबलेलं आहे. तर दुसरीकडे प्रत्येक रुग्णालयात आणि शवगृहात या कंपनीत काम करत असलेल्या कामगारांचे नातेवाईक रात्री अंधारात कंपनीच्या अवतीभवती शोध घेत आहेत.
डोंबिवली ब्लास्ट झाल्यानंतर अनेक कुटुंबाचे नातेवाईक आजूनही बेपत्ता आहेत. पिंटू जयसवार यांचे नातेवाईक भरत जयसवार (वय 40 वर्ष) हे कंपनीत कामाला होते. पण ब्लास्ट झाल्यानंतर बेपत्ता आहेत. तर दुसरीकडे मूळचा यूपीचा असलेला राकेश राजपूत आपल्या पत्नी, पाच मुली, दोन मुले यांच्याबरोबर कंपनी परिसरातच राहायचा. तो देखील बेपत्ता आहे. त्याचा भाऊ देखील त्याचा शोध घेत आहे.
‘घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की…’
अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. “दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की, जेव्हा आम्ही आलो तेव्हा आसपास आम्हाला लोखंड पडलेलं दिसलं. काही पत्रे पडलेले दिसले. काचा फुटलेल्या दिसल्या. सध्या तरी संपूर्ण आग विझलेली असून सर्च ऑपरेशन मात्र सुरू आहे. माझ्यासमोर 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले. अजूनही आतमध्ये लोक अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
“अंबरनाथ, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली अशा सर्व अग्निशमन दलाच्या यंत्रणा इथं कार्यरत आहेत. रात्रीच्या अंधारामुळे आता सर्च ऑपरेशनला काही अडचणी येत आहेत. मात्र उद्या सकाळी या कामाला वेग येऊन सर्च ऑपरेशन पूर्ण होईल. या ब्लास्टमुळे आसपासच्या देखील कंपन्यांमध्ये आग लागली होती. ती देखील आग विझवण्याचे काम झालेलं आहे. तिथे देखील सर्च ऑपरेशन सुरू आहे”, असं नामदेव चौधरी यांनी सांगितलं.