Kalyan Crime | कल्याणमधील हायप्रोफाईल खडकपाडा परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, तरुण गंभीर जखमी
कल्याणमधील हायप्रोफाईल मानल्या जाणाऱ्या खडकपाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत मित्राकडूनच मित्राला गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झालाय.
सुनील जाधव, Tv9 मराठी, ठाणे | 4 ऑक्टोबर 2023 : कल्याणमधील हायप्रोफाईल खडकपाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील शहाड-मोहना परिसरात ही घटना घडली आहे. 5 ते 6 मित्र एकत्र बसून चर्चा करत असताना एकाने बंदूक काढून गोळी झाडल्याची माहिती समोर आलीय. झटापटीमध्ये एका तरुणाच्या तोंडाला लागली गोळी लागली. ही गोळी जीभ फाडून घशापर्यंत गेली. जखमी तरुणाचं नाव सुशील मेहता असं आहे. त्याला उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गोळी लागल्यामुळे सुशील गंभीर जखमी झालाय. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी ठाण्याचे शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं.
कल्याण शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही केल्या घट होताना दिसत नाही. याउलट दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कल्याणच्या मोहने परिसरात गोळीबाराची घटना समोर आलीय. मोहणे परिसरात सुशील मेहता आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. याचवेळी एका मित्राने त्याच्याकडील बंदुकीतून सुशीलवर गोळी झाडली.
हाताचा पंजा फाडून गोळी तोंडात गेली आणि…
यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली. मात्र यात त्याची जीभ देखील फाडली गेली. सध्या सुशीलच्या घशामध्ये ही गोळी अडकली आहे. सुशीलला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार करून त्याला कळव्याच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलं आहे.
हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र मित्रांनीच मित्रावर गोळी झाडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी स्थानिक खडकपाडा पोलीस ठाण्यात कुठल्याच प्रकारची माहिती नसल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पोलिसांची गस्त कमी असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा वावर सुरू झालाय. मोहने बंदरवाडा परिसरात अशा मारहाणीच्या घटना सातत्याने घडत असतात.