ठाणे: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एखाद दोन नगरसेवकांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिंदे यांनी बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. शिंदे गटाला ठाण्यातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी हा प्रवेश सोहळा होणार आहे. पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी नगरसेवक फुटीची बातमी टेन्शन देणारी ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपा प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वच 4 माजी नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता लक्ष्मी पार्क सर्व्हिस रोड येथील होणाऱ्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे पाचही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे शिवाई नगरमधील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलोचना चव्हाण या देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित जाहीर प्रवेश करणार आहेत.
हणमंत जगदाळे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत. ठाण्यातील अनुभवी आणि जुने नगरसेवक आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते. 1977 पासून म्हणजे गेल्या 46 वर्षांपासून ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र, आता त्यांनी पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिल्यानेच माझ्या विभागाचा विकास होऊ शकतो. पक्ष सोडताना मी पक्षातील वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली. विकास करण्यासाठी शासनाची गरज आहे. माझ्या पक्षातील नेत्यांच्या बद्दल आदरभाव आहे.
त्यांनी मला सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी असेल. पक्ष प्रवेश केल्यानंतर मला काही मिळणार असेल तर ते फक्त माझ्या विभागातील विकास, असं माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी सांगितलं.
1977 पासून पवार साहेबांसोबत काम करत होतो. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. माझी राष्ट्रवादी पक्षातील कोणत्या ही पदाधिकारी व कार्यकर्त्याबाबत तक्रार नाही. लोकमान्य नगरमधील क्लस्टरची मागणी पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, असं जगदाळे यांनी सांगितलं.
हणमंत जगदाळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्ष नेते
राधाबाई जाधवर, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
दिगंबर ठाकूर, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
वनिता घोगरे, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
सुलोचना चव्हाण, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
इतर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते