धक्कादायक ! डोंबिवली सारख्या शहरात रुग्णवाहिका बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू; नातेवाईकांनाच रुग्णवाहिकेला धक्का मारावा लागला
सुर्यकांत देसाई यांना गुरुवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डोंबिवलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.
डोंबिवली : डोंबिवली सारख्या सर्व सोयी सुविधा असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना घडली आहे. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करत असताना वाटेतच रुग्णवाहिका बंद पडल्याने माजी आमदार सुर्यकांत देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाई यांचा मृत्यू झाल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. तसेच संबधितांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
सुर्यकांत देसाई यांना गुरुवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डोंबिवलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिका आली तेव्हाच ती अर्धवट बंद होती. जेव्हा देसाई यांना रुग्णवाहिकेत नेले तेव्हा त्यांचा प्लस रेट 60 पर्यंत होता. थोड्या अंतरावर गेल्यावर ही रुग्णवाहिका बंद पडली. त्यानंतर आम्ही सर्व नातेवाईकांनी मिळून या रुग्णवाहिकेला मंजुनाथ शाळेपर्यंत धक्का दिला.
तब्बल अर्धा किलोमीटर आम्ही रुग्णवाहिका ढकलत नेली. या दरम्यान नोबेल्स रुग्णालयातून दुसरी रुग्णवाहिका मागवण्यात आली. त्यानंतर देसाई यांना ममता रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. यावेळी देसाई यांचा ईसीजी काढण्यात आला. मात्र, तोपर्यंत देसाई यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती देसाई यांच्या पुतण्याने दिली.
पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान, रुग्णवाहिकामध्येच बंद पडल्याने देसाई यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने या रुग्णवाहिकेच्या मालकाविरोधात देसाई यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिवसेनेचे परळचे माजी आमदार
माजी आमदार सुर्यकांत देसाई हे 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ते परळ येथील शिवसेनेचे माजी आमदार होते. 1995 ते 2000 या काळात ते परळ-लालबाग विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार म्हणून काम पाहिले होते. अलिकडे ते डोंबिवलीत राहायला आले होते.