पीडितेवरील दबावाचा ‘तो’ युक्तीवाद, आणि युक्तीवादाला आव्हाडांच्या वकिलाचा विरोध, कोर्टात ‘असा’ रंगला युक्तीवाद
जितेंद्र आव्हाडांना सहजासहज अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही, तर त्यासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांना प्रचंड युक्तीवाद करावा लागला. विशेष म्हणजे पोलीसही आव्हाडांच्या जामिनाला विरोध करत होते.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दिलासा मिळालाय. ठाणे सेशन्स कोर्टाने विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर आणि पोलिसांना तपासासाठी सहकार्य करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. आव्हाडांना सहजासहज हा जामीन मंजूर झाला नाही, तर त्यासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांना प्रचंड युक्तीवाद करावा लागला. विशेष म्हणजे पोलीसही आव्हाडांच्या जामिनाला विरोध करत होते. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढल्या होत्या.
ठाणे सेशन्स कोर्टात सरकारी वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रचंड युक्तीवाद केला. वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्याप्रकरणी त्यांच्यासाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. पण त्यांचं पालन आव्हाडांकडून झालं नाही, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येऊ नये. कारण त्यांना जामीन दिल्यास ते तक्रारदारावर दबाव आणू शकतात, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांनी देखील कोर्टात विरोध केला. या प्रकरणातील आणखी काही फुटेज आणि व्हिडीओ आम्हाला मिळवायचे आहेत. त्यामुळे आव्हाडांना जामीन मिळू नये, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
दुसरीकडे ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने युक्तीवाद केला. चव्हाण यांनी सगळे मुद्दे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही व्हिडीओदेखील न्यायमूर्तींच्या समोर सादर केले. आव्हाडांनी जाणीवपूर्वक महिलेला धक्का दिलेला नसल्याचं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. संबंधित तक्रारदार महिलेला जितेंद्र आव्हाड बहीण मानतात. मग बहीण मानणाऱ्या महिलेचा ते विनयभंग कसा करतील? असा प्रश्न वकिलांनी कोर्टात उपस्थित केला.
गर्दीतून वाट काढण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी त्या महिलेला बाजूला व्हा, एवढ्या गर्दीत कशाला येता? असं म्हणत बाजूला केलं होतं, असा युक्तीवाद जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी केला.
ठाणे सेशन कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर दुपारच्या सत्रात निकाल देऊ, अशी माहिती दिली. त्यानंतर कोर्टाने दुपारच्या सत्रात जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांचा जामीन मंजूर केला.
जितेंद्र आव्हाडांना तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याची अट कोर्टाकडून ठेवण्यात आलीय. पोलीस जेव्हा बोलावतील तेव्हा आव्हाडांना पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल, असं कोर्टाने नमूद केलंय.