एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव; हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप
एसटी कामगारांचा संप कर्मचारी संघटनांच्या हातातून निसटला आहे. हा संप भाजपच्या हातात गेला असून भाजपचे आमदार संपाचा फायदा घेत आहेत.
ठाणे: एसटी कामगारांचा संप कर्मचारी संघटनांच्या हातातून निसटला आहे. हा संप भाजपच्या हातात गेला असून भाजपचे आमदार संपाचा फायदा घेत आहेत. या संपाच्या माध्यमातून कामगारांची माथी भडकावून सरकार अस्थिर करण्याचा डाव भाजपचा आहे, असा गंभीर आरोप भटके-विमुक्त, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. दरम्यान, सरकारने चार पावले पुढे यावे, तर कामगारांनी दोन पावले मागे येऊन आपले हित कशामध्ये आहे, हे लक्षात घ्यावे. एसटी संपावर खासगीकरण हा उपाय नाही, असेही राठोड यांनी स्पष्ट केलं आहे.
हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. एसटीच्या खासगीकरणाचा फटका जसा कर्मचाऱ्यांना बसणार आहे. तसाच प्रवाशांनाही बसणार आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आपले हित ओळखून दोन पावले मागे यावे, असे आवाहनही राठोड यांनी केले. यावेळी कास्ट्राईब संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे उपस्थित होते.
कामगारांनो, मध्यम मार्गासाठी पुढाकार घ्या
एसटी कामगारांच्या संपाचा राजकिय फायदा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम विरोधकांकडून चालू आहे. एसटीमध्ये सर्वाधिक बहुजन वर्गातील म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हिजेएनटी समूहाचे लोक नोकरी करीत आहेत. या वर्गाच्या हिताकडे पाहण्याऐवजी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे या संपावर तोडगा काढण्या ऐवजी खासगीकरणाबाबत सुतोवाच केले जात आहे. त्यामुळे आता “भीक नको पण कुत्रा आवर”अशी परिस्थिती कामगारांची झाली आहे. कामगारांनी हे कटकारस्थान ओळखून आपले हित कशात आहे, याचा विचार करून खासगीकरण व विलीनीकरण या दोन्हीं गोष्टीं बाजूला ठेवावा. कामगारांनी मध्यममार्ग काढण्यासाठी दोन पावले मागे जाणे गरजेचे आहे. तर सरकारने चार पाऊले पुढे जावून बहुजन वर्गातील कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
तशी गत एसटी कामगारांची होऊ नये
राज्यात एसटी महामंडळ म्हणजे गोर गरीब प्रवाशांच्या सेवेकरिता नेहमीच तत्पर असते. या लालपरीचे ब्रीद वाक्यच ” बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे असून प्रवाशांच्या सेवेसाठी दऱ्याखोऱ्यात, वाड्यावस्त्यात, खेड्यापाड्यात, एसटी महामंडळाचे जाळे विणले गेले आहे. विशेष वर्गाकरिता म्हणजेच जेष्ठ नागरिक, पत्रकार, पुरस्कारकर्ते (आदिवासी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, इ.) तसेच अंध अपंग व्यक्ती, स्वतंत्रसैनिक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, शेत मजूर, विधवा महिला, परितक्त्या, दुर्बल घटक आदींना एसटी महामंडळाकडून सवलती देण्यात येतात. खासगीकरण झाल्यास हे सर्व संपुष्टात येईल आणि म्हणूनच एसटीच्या खासगीकरणाविरोधात तमाम बहुजन वर्ग रस्त्यावर उतरेल. शिवाय, कामगारांचे कायमचे नुकसान होऊ नये, गिरणी कामगार देशोधडीला लागला तशी गत एसटी कामगारांची होऊ नये, हा प्रामाणिक उद्देश डोळ्या समोर ठेऊन एसटी महामंडळाचे खासगीकरण करू नये, असे आवाहन त्यांनी केलं.
विलिनीकरण शक्यच नाही
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी ही शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन व भत्ते या प्रमाणे सवलती मिळाव्यात, अशी होती. एसटी महामंडळाचे सरकारी विलनीकरण हे कुठल्याही परिस्थितीत शक्य नसून, अशी मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे हा संप मिटवण्यासाठी सरकार व कामगार यांच्यामध्ये योग्य तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधकांनीही प्रयत्न करावेत, यामध्ये राजकारण करू नये, असेही त्यांनी सांगितले.
तिघेजण कामगारांना भडकावत आहेत
या आंदोलनामागे भाजपचे राजकारण आहे. लोकांना भडकावण्यामागे अॅड.. सदावर्ते, आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर हे आहेत. नेमलेल्या समितीचा अहवाल येत असतानाही हे तिघेजण कामगारांना भडकावून त्यांचे नुकसान करीत आहेत. मान्यताप्राप्त संघटनेमुळेच पाचवा वेतन आयोगाचे लाभ मिळाले नाहीत. त्यांना जाब विचारण्याऐवजी विलनीकरणाचा नारा दिला जात आहे. त्यास वेळ लागणार आहे. तरीही दिशाभूल केली जात आहे, असा आरोप सुनील निरभवणे यांनी केला.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! महाराष्ट्रात आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवली