गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा तोडण्यात आली आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंब्र्यात येणार आहेत. उद्धव ठाकरे येणार असल्याने शिंदे गटाचे कार्यकर्तेही मुंब्र्यात जमले आहेत. त्यामुळे मुंब्र्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंब्र्याला छावणीचं स्वरुप आलं आहे. एवढेच नव्हे तर मुंब्र्यात दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे येणार असल्याने मुंब्र्यात ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यापासून मुंब्र्यापर्यंत मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मुंब्र्यात 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 3 एसआरपीएफच्या तुकड्या, 2 दंगल नियंत्रण पथक, 3 डीसीपी, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी अधिकारी यावेळी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रत्येक टीमला वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं स्वत: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड स्वागत करणार आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मुंब्रा वेशीवर आव्हाड हे ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत. मात्र, आव्हाड यांनी ठाण्याच्या वेशीवर येऊन उद्धव ठाकरे यांचं स्वागत केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कळव्यात स्वागत करण्याची विनंती केली आहे.
उद्धव ठाकरे यांना बजावण्यात आलेली 144 ची नोटीस रद्द करण्यात आल्याबद्दल मी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचं अभिनंदन करतो. माजी मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत कोणी 144 ची नोटीस बजावलेली आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पोलीस मुंब्र्यात भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले असते आणि गेले असते. पण पोलिसांनी गेल्या 12 तासांपासून हा मुद्दा तयार केला आहे. काही गरज नसताना हा वाद मोठा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.