फेरीवाल्याकडून मापात पाप, ग्राहकाने लावला चाप, माफी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल
डोंबिवलीत एका ग्राहकाच्या ही बाब लक्षात आली. तो काही थांबला नाही. थेट दुकानदाराकडे गेला. त्याला मापात पाप का केलंय, याचा जाब विचारला.
सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : ग्राहक वस्तू खरेदी करतात. त्यावेळी ते मोजून घेतात. पण, कधी-कधी काही दुकानदार माप योग्य पद्धतीने देत नाही. यात ग्राहकांची फसवणूक होते. घरी आल्यानंतर लक्षात येते. पण, वेळ निघून गेलेली असते. असे आपल्याला दुकानदाराने वजनात फसवले वाटते, अशी शंका व्यक्त केली जाते. डोंबिवलीत एका ग्राहकाच्या ही बाब लक्षात आली. तो काही थांबला नाही. थेट दुकानदाराकडे गेला. त्याला मापात पाप का केलंय, याचा जाब विचारला. माफी मागायला लावली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही
एका द्राक्ष विक्रेत्याने ग्राहकाला दीड किलो द्राक्षाच्या जागी 800 ग्राम द्राक्ष दिले. संतप्त ग्राहकाने मापात पाप करणाऱ्या फेरीवाल्याला चांगलाच चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या स्कायवाकवर असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणी कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. सध्या व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
डोंबीवली रेल्वेस्थानक स्कायवाकवरील प्रकार
गुरुवारी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या स्कायवाकवर एका ग्राहकाने द्राक्ष विकणाऱ्या फेरीवाल्याकडून दीड किलो द्राक्ष विकत घेतले. त्याचे पैसेही दिले. मात्र घेतलेले द्राक्ष कमी दिसल्याने त्या ग्राहकाने बाजूच्या दुकानावर ते द्राक्ष किती आहेत म्हणून पुन्हा मोजले. याला दीड किलोच्या जागी 800 ग्राम वजनाचे द्राक्ष असलेलं कळलं.
संतप्त झालेला तो ग्राहक पुन्हा या द्राक्ष विकणाऱ्या फेरीवाल्याकडे गेला. मोबाईलमध्ये चित्रीकरण करत त्याच्या मापात पाप करण्याचा गोरख धंद्याचं उघडकीस आणून त्याला चांगला चोप दिला.
२५ मिनिटे घातला गोंधळ
तब्बल 25 मिनिटाच्या या गोंधळानंतर फेरीवाल्यांनी हाथ जोडून माफी मागितली. उठाबशा काढल्यानंतर फेरीवाल्याला पळवून लावले. फेरीवाल्यांचा मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा फेरीवाला विरुद्ध ग्राहकांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.