कुंपणच शेत खातंय! म्हाडाच्या कोव्हिड रुग्णालयाचे अत्याधुनिक साहित्य आरोग्य अधिकाऱ्याकडून लंपास
ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे (Jitendra Awhad allegations on Health officer of thane municipal over covid center)

ठाणे : कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती. या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावण्यात आले होते. मात्र, मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. रुग्णालयातील साहित्य जसे होते त्या स्थितीत 48 तासात पुन्हा स्थानापन्न केले नाही तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे (Jitendra Awhad allegations on Health officer of thane municipal over covid center).
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यासाठी कौसा येथे म्हाडाच्या वतीने अद्ययावत असे कोविड रूग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला. हाच फायदा घेऊन डॉ. मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला (Jitendra Awhad allegations on Health officer of thane municipal over covid center).
जितेंद्र आव्हाडांनी पाहणी केल्यानंतर संबंधित प्रकार उघड
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील रूग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे जितेंद्र आव्हाड हे प्रचंड संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणाऱ्या मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
“कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी रूग्णालयातील सुमारे 94 व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत”, असं आव्हाड यांनी सांगितलं.
“म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाईपलाईनदेखील तोडून टाकण्याचे काम मुरूडकर यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? असा सवाल करीत अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या 48 तासात सर्व साधने पूर्व स्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा : राज्यात रक्ताची कमतरता; जितेंद्र आव्हाड यांनी केलं ‘हे’ आवाहन