ठाणे : ठाण्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील बडे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्तांना मारहाण केलीय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या वादामागे सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आणि त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विशेष म्हणजे नताशा यांनी आज वडील जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण पोलीस ठाण्यात तक्रार केली पण आपली दखल घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली.
संबंधित ऑडिओ क्लिपमुळे आपल्या कुटुंबात कशी खळबळ उडालीय याबद्दल नताशा यांनी प्रतिक्रिया दिलीय. संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आपल्या सासरची मंडळी खूप घाबरले आहेत. सासरच्यांकडून आपल्या पतीला घराबाहेर पडण्यास परवानगी नाकारली आहे, असं नताशा यांनी सांगितलंय.
“मी राजकारणात नाहीय. पण मला राजकारणात खेचलं जातंय. मला इथे पत्रकार परिषदेत यावं लागतंय. कारण आम्हाला कुणीच मदत करत नाहीय. माझ्या पतीचं कुटुंब तर राजकारणात अजिबात नाहीय. माझ्या कुटुंबियांनी पतीला घराबाहेर निघण्यासाठी परवानगी दिलेली नाही. सगळे खूप घाबरलेले आहेत”, अशी उद्विग्नता नताशा यांनी आपल्या वडिलांसमोर व्यक्त केली.
“दोन दिवसांपूर्वी ती ऑडिओ क्लिप व्हारल झाली तेव्हा मी आणि माझ्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पण ठाणे पोलिसांनी आमची तक्रार घेतलेली नाही. याशिवाय आम्हाला कोणतीही सुरक्षा पुरवली गेलेली नाही. अधिकाऱ्याला ज्युपिटरमधून डिसचार्ज मिळाला आहे. आमच्या सुरक्षेची कोण काळजी घेत आहे?”, असा प्रश्न नताशा यांनी उपस्थित केला.
“कुणीही आम्हाला मदत करत नाहीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा देणार असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनीदेखील अजून सुरक्षा पुरवलेली नाही. आम्ही कुठे जायचं? आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात एक मिनिटात तक्रार घेऊन कारवाई केली. पण जे ऑडिओ क्लिपवरुन झालंय त्या बद्दल मी पोलीस ठाण्यात गेले, आमच्या जीवाला धोका आहे, असं सांगितलं. पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही”, असं नताशा यांनी सांगितलं.