उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्यच, पण मी मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो…. : जितेंद्र आव्हाड
माझी आई देखील 27 दिवसांत कॅन्सरने वारली आहे. असे धंदे मी करत नाही. मी कोणाची घरं काढून घेतली नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad reaction on CM Uddhav Thackeray decision about to give flat in Bombay Dyeing for Tata Cancer Hospital).
ठाणे : “ही घरं काही माझ्या बापाची नाहीत. जर गरीबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय? याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाहीय. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी घरे काढून घेतली जात आहेत. तर मी माझ्या मेलेल्या आईची शप्पत घेतो मी त्यातला माणूस नाही. माझी आई देखील 27 दिवसांत कॅन्सरने वारली आहे. असे धंदे मी करत नाही. मी कोणाची घरं काढून घेतली नाही. जे अधिकचे गाळे वाटण्यात आले त्यांच्यावर म्हाडाचा अधिकार होता. ती वाटण्यात आली आहेत”, अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली (Jitendra Awhad reaction on CM Uddhav Thackeray decision about to give flat in Bombay Dyeing for Tata Cancer Hospital).
नेमकं प्रकरण काय?
टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता. मात्र, या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय.
“100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहेत. स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज सांगितलं, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला, बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
मला आनंद आहे कि उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा किती सन्मान करतात, आपल्या मंत्री मंडळाच्या मंत्र्याने आपली परवानगी घेऊन घेतलेल्या निर्णयाला जर आपला शिवसेनेचा आमदार विरोध करतोय तर त्याची मर्जी पहिली राखली पाहिजे, त्यांचा हा दृष्टीकोण मला वाटतं की एक नेता म्हणून वाखण्याजोग्या आहे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
‘मी कोणतीही गोष्ट पूर्व परवानगीशिवाय करत नाही’
“परळ नाक्यावर ही शंभर वर्षे जुनी ही चाळ होती. तिचा पुनर्विकास करण्याचं ठरलं आणि तिचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या एकाही राहिवाश्याला बेघर केलंल नाही. आर आर बोर्डानुसार अधिकचे घर मास्टर लिस्टमध्ये जातात आणि त्यातून विस्तापितांना तिथे अधिकची घरे देणं हा म्हाडाला अधिकार आहे. यातील 192 घरे म्हाडाच्या हातात होती. मुख्यमंत्र्यांनीच कॅन्सरग्रस्तांच्या म्हाडा सदनिकांना परवानगी दिली होती, मी कोणतीही गोष्ट पूर्व परवानगीशिवाय करत नाही”, असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
‘कॅन्सर हवेतून पसरणारा आजार नाही’
“आमदार अजय चौधरी यांच्या सांगण्यावरून त्यांची अनेक कामे मी केली आहेत. परळ येथील 100 सदनिका या कॅन्सरपिडीतांच्या नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरुपात दिल्या जाणार आहेत. तिथे कॅन्सररुग्ण राहणार नाहीत. याबबात अजय चौधरी यांचा गैरसमज झाला असून तो गैरसमज दूर केला जाईल. पण कॅन्सर हवेतून पसरणारा आजार नाही”, असा टोलाही यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अजय चौधरी यांना लगावला.
“शरद पवार साहेबांना मी हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो. तेव्हा त्यांना परळ येथील 100 सदनिका या कॅन्सरपिडीतांच्या नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरुपात देण्याबाबत सांगितले होते. तेव्हा साहेब स्वत: बोलले होते हॉस्पिटलमधून बाहेर पडलो की पहिले या सदनिकांचे उद्घाटन करेन. तर या सदनिकांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. ते मला म्हणाले होते, पवार साहेबांच्या हस्तेच उद्घाटन कर पण गर्दी करु नकोस. यावरुनच कळतं की ते याबाबतीत किती संवेदनशील आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
संबंधित बातम्या :