Raj Thackeray Vs Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला, पान नंबर सांगा ना? राज ठाकरेंना आव्हाडांनी पान नंबर तर सांगितलंच पण उताराही
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर होणाऱ्या टीकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या ठाण्यातील सभेतून समाचार घेतला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले.
ठाणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर होणाऱ्या टीकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी कालच्या ठाण्यातील सभेतून समाचार घेतला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. पण ते नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणून त्यांच्यावर नेहमीच टीका झाली. बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांनी चुकीचा इतिहास सांगितला असेल तर पान नंबर सांगा ना? असं आव्हानच राज ठाकरे यांनी दिलं होतं. राज यांचं हे आव्हान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी स्वीकारलं आहे. आव्हाडांनी पुरंदरेंनी सांगितलेला चुकीचा इतिहास, पुस्तकातील पान नंबर सांगतानाच तो उताराही सांगितला आहे. त्यामुळे आता मनसेकडून आव्हाड यांच्या या पुराव्यावर काय उत्तर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भाष्य केलं. शाहू, फुले. आंबेडकर हे शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार होते. पण राज यांनी कधी बहुजनांचा इतिहास वाचलाच नाही. त्यांनी फक्त बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला इतिहास वाचला. ज्या पुरंदरेनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली. जेम्स लेनच्या पुस्तकातील पान नंबर 93, पॅरेग्राफ नंबर 4 राज ठाकरेंनी वाचावा, असा सल्ला आव्हाड यांनी दिला.
हा जातीयवाद कोणी निर्माण केला?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला सती न जाऊ देता कर्मकांड नाकारले, हे राज ठाकरे यांना माहीत नाही. कारण, दुर्देवाने राज ठाकरे हे फक्त पुरंदरे वाचत आहेत. त्यामुळे त्यांना खरा इतिहास त्यांना माहित नाही. अफझल खानाचा कोथळा काढला त्यावेळी त्याच्या वकिलाने महाराजांवर तलवार चालविली. तो वार करणार्या वकिलाचे नाव होते, कृष्णा भास्कर कुलकर्णी. शिवरायांनी त्याचे मुंडके उडविले. नंतर मावळ्यांनी ते तलवारीवर घेतले अन् नाचत-नाचत गडाच्या खाली उतरले. त्यानंतर जिजाऊंच्या आदेशानुसार शिवरायांनी अफझल खानाची कबर बांधली. पण, शिवरायांनी कृष्णा कुलकर्णीची समाधी बांधली नाही. तर, शिवरायांच्या मावळ्यांनी ते मुंडके लाथाडून-लाथाडून जंगलाच्या बाहेर फेकले, हा खरा इतिहास सांगण्याची हिमंत राज ठाकरे यांनी दाखवावी, असं आव्हान त्यांनी केलं. तसेच त्यानंतरच्या इतिहासात काय झाले? जिंकले तर पेशवे आणि हरले तर मराठे, हा जातीयवाद कोणी निर्माण केला?, असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी पुरंदरे वाचलेत, खोटा इतिहास सांगत आहेत
राज ठाकरे यांनी माझी अक्कल काढली. राज हे खूप हुशार आहेत. पण, त्यांच्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेले पुस्तक राज यांनी वाचावे. सातारच्या गादीच्या वारसांना पेशव्यांनी कसे कोंडून ठेवले होते अन् त्यांची आई ही प्रतापसिंह राजांना पहाटे कशी शिकवायची, हे प्रबोधनकारांनीच लिहून ठेवले आहे. राज यांनी म्हटले की, शरद पवार हे फक्त शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधून काढली. साधने नसताना केवळ अभ्यासाच्या जोरावर समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज तर त्यांचे वारसच होते. अन् हे दोघांचाही वारसा मी जपतो. त्यांना आदर्श मानत डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्यामुळे तिघांच्या रक्तात, शब्दात, कृतीत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे या तिघांचेही नाव घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यासारखेच आहे. पण, राज यांना हे समजणार नाही. तेवढी त्यांची बुद्धी नाही. कारण, राज ठाकरे यांनी जर प्रबोधनकार वाचले असते तर आपल्या भाषणातल्या चुका त्यांना दिसल्या असत्या. दुर्दैवाने त्यांनी पुरंदरे वाचलेत. त्यामुळेच ते खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
तुमच्या सैनिकांना एवढं तरी माहीत नाही का?
हिडीस-फिडीस बोलत असताना तुम्हाला इंधनाचे, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव दिसत नाहीत? त्याच्यावर काहीच बोलणार नाहीत. राज ठाकरे हे एवढे भोंग्यांबद्दल बोलत आहेत मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिथे सभा घेतली, तिथे सायलेन्स झोन आहे. सभेच्या एका बाजूला सेंट जॉन स्कूल आणि दुसर्या बाजूला शिवसमर्थ विद्यालय आहे आणि मागे दगडी शाळा आहे. कोर्टाच्या नियमानुसार शाळेच्या 100 मीटर परिसरात भोंगे लावायचे नसतात. तुमच्या सैनिकांना एवढं तरी माहीत नाही का? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: