ठाणे: एककीडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाची युतीची चर्चा सुरू आहे. या युतीवर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र, आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ऐंशी कोनात बदलणार आहे. असं असतानाच आता दलित समाजातील मोठे नेते, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आधी दलित पँथर आणि आता कवाडे यांनासोबत घेऊन एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काल उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीत भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्यावर चर्चा करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी या युतीला सकारात्मक प्रतिसादही दिल्याचं कवाडे यांनी सांगितलं आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये पुढील चर्चा होणार असून महापालिका निवडणुकीतच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रं आल्याचं दिसून येणार असल्याचंही कवाडे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा अजेंडा त्यांना सांगितला. आमच्या पक्षाची भूमिकाही सांगितली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संयुक्त घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती कवाडे यांनी या भेटीनंतर दिली. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. राज्यातील राजकारण अत्यंत निसरडे असून पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार असल्याचे ते म्हणाले होते. ज्या काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली त्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप कवाडे यांनी केला होता.
अन्य कुठल्या पक्षांनी सन्मानजनक जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवल्यास सोबत जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानेही योग्य प्रस्ताव दिल्यास त्यासोबत जाण्याची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
त्यानंतर काल शिंदे आणि कवाडे यांची भेट झाल्याने आता स्वबळावर लढण्याऐवजी शिंदे गटाशी युती करून लढण्याचं कवाडे यांनी नक्की केल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दोन्ही नेत्यांची तासभर बैठकही झाली होती. त्यात दोघांनी एकत्र मिळून निवडणूक लढण्याचा निर्णयही घेतला होता.
त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन वेळा युतीबाबत चर्चा झाली. जागा वाटप आणि युतीचं स्वरुप यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या युतीवर शिक्कामोर्तब केले जाण्याचे संकेतही मिळत आहेत.