BREAKING | अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांकडून महत्त्वाची कारवाई
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी महत्त्वाची कारवाई केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी कुठपर्यंत जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांच्यावरील शाईफेक आणि मारहाण प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. तसेच कळवा पोलीस ठाण्यातच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भीम नगर या ठिकाणी, 16 जूनला संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना महिला आघाडी अध्यक्षा कळवा विभाग यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त ‘विनम्र अभिवादन’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमाला अयोध्या पोळ यांना अतिथी म्हणून बोलावण्याचा बहाणा करून मारहाण करण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमेला हार घालण्याच्या वादातून आयोध्या पोळ यांच्या अंगावर नीळ फेकून आणि त्यांच्या चेहऱ्याला निळ लावण्यात आले. तसेच त्यांना मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात येतोय.
महिलांवर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल
आयोध्या पोळ यांनी या घटनेप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या कार्यक्रमात आयोध्या पोळ यांच्या चेहऱ्याला शाई लावणाऱ्या महिला, तसेच त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 300/2023 भादवि कलम 143, 145, 147, 149, 341, 323, 324, 120 ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर आलीय.
सदर गुन्ह्यात दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. संबंधित परिसरात परिस्थिती शांत आहे. तसेच परिसरातील राजकीय आणि सामाजिक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अयोध्या पोळ यांनी सांगितला घटनाक्रम
दरम्यान, अयोध्या पोळ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “त्यांनी मला पक्षाचा कार्यक्रम आहे, असं निमंत्रण दिलं. त्यानंतर त्यांनी 11 जूनला सातत्याने मला पक्षाचे वेगवेगळे डिजीटल कार्यक्रमाचे बॅनर दाखवून निमंत्रित केले. त्यामुळे मी कार्यक्रमाला गेले. नगरसेवक गणेश कांबळे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि माझा फोटो होता”, असं अयोध्या पोळ म्हणाल्या.
“मी त्यांना म्हणाली की, बाकीचे मान्यवर का आले नाही? तर त्यांनी ते येत आहेत, असं सांगितलं. त्यांच्याचकडे सर्व रेकॉर्डिंग आहे. माझ्याकडे याबाबतचे रेकॉर्डिंग नाही. पाच ते सहा मुलं सर्व रेकॉर्डिंग करत होते. यामागे नेमकं कुणाचं षडयंत्र आहे? मी महापुरुषांचा काय अपमान केला? हे त्यांनी मला दाखवून द्यावं”, असं अयोध्या पोळ म्हणाल्या.