Ganpat Gaikwad Firing | कल्याणमधील भाजप कार्यकर्ते लवकरच देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, पडद्यामागे काय घडतंय?

| Updated on: Feb 04, 2024 | 9:04 PM

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Ganpat Gaikwad Firing | कल्याणमधील भाजप कार्यकर्ते लवकरच देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us on

सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 4 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे कल्याण डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी चलबिचल असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वेळ मागितला आहे. ते लवकरच फडणवीस यांची भेट घेणार आहेत. याबाबत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना माहिती दिली. “जी घटना घडली त्याचा समर्थन करणार नाही. ही घटना फ्रस्टेशनमुळे घडली आहे. आमचं या घटनेला समर्थन नाही. मात्र ही घटना घडली त्याच्यापाठी पार्श्वभूमी काय आहे हे पाहायला हवं. कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत, जे मनभेद झालेले आहेत. त्याच्यावर पडदा पडला पाहिजे. यावर पक्ष नेतृत्वाने भूमिका बजावणे गरजेचे आहे”, असं मत नरेंद्र पवार यांनी व्यक्त केलं.

“अजूनही शंभर टक्के वाद मिटलेला नाही. मागच्या वेळेला मी आरोप केले, पक्षाच्या अनेक निर्णयांवर नाराजगी व्यक्त केली होती. वर्षभरात भिवंडी लोकसभेत कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये वाद दिसत नाही. मात्र कल्याण पूर्वेत वाद मिटवण्यासाठी नेतृत्व कमी पडलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या वादत लक्ष घालून वाद मिटवावे”, असं आवाहन नरेंद्र पवार यांनी केलं. “शिवसेना-भाजपच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खालपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये संवाद करून समन्वय करण्याची विशेष गरज आहे. आम्ही नेतृत्वाला विनंती करू की, आमच्या कल्याण डोंबिवलीमधला वाद मिटवावा. भविष्याच्या लोकसभा निवडणुका या दृष्टीने हे गरजेचं आहे”, असं नरेंद्र पवार म्हणाले.

‘कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, याचा विचार व्हावा’

“पक्ष नेतृत्वाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून लवकरात लवकर वाद मिटवावा. कार्यकर्ते दोन्ही बाजूने समर्थन दाखवणार. समर्थन दाखवण्याची कालची गोष्ट नाही. मात्र कोर्टामध्ये काही कार्यकर्त्यांनी घोषणा केल्या. त्यांच्यावर खटले दाखल केले. त्याचादेखील विचार व्हावा. कार्यकर्त्यांची भावना समजून घ्यावी. समन्वय झाला तर अशा घटना घडणार नाहीत”, असं देखील पवार म्हणाले.

“याबाबत चर्चा व्हावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांच्याकडे केली आहे. लवकरात लवकर दोन्ही नेतृत्वाच्या नेत्यांनी खाली येऊन उतरून ही भांडणं मिटवावी. वरिष्ठांशी मेसेज, फोन आणि प्रत्यक्षात बोलणे झाले आहे. समन्वयाकरता त्यांनी वेळ द्यावा, अशी भूमिका सगळ्यांची मांडली”, अशी माहिती नरेंद्र पवार यांनी दिली.