Akhilesh Shukla : धक्कादायक, MTDC मध्ये नोकरीला असलेल्या अखिलेश शुक्लाच्या गाडीत लाल दिवा कसा?
Akhilesh Shukla : कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाने काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्याची कार नंतर पोलिसांनी जप्त केली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात (MTDC) नोकरीला असलेल्या अखिलेश शुक्लाच्या कारमध्ये शासकीय अंबरदिवा सापडला आहे. हे धक्कादायक आहे.
कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. काल विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने अमानुष हल्ला केला. एका छोट्याशा किरकोळ वादातून हे सर्व घडलं. परप्रांतीय कुटुंबाने बाहेरुन गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. धूप-अगरबत्ती लावण्यावरुन हा सर्व वाद सुरु झाला. सोसायटीतील रहिवासी अखिलेश शुक्ला आणि लता कळविकट्टे यांच्यात धूप-धूर यावरून वाद सुरु होता. वादात शुक्ला यांनी मराठी माणसांचा अपमान करणारे शब्द उच्चारले, ज्यावर धीरज देशमुख यांनी आक्षेप घेतला, विरोध केला.
या सगळ्या वादात अखिलेश शुक्लाने तो मंत्रालयात काम करत असल्याची धमकी दिली. शुक्लाने बाहेरून आठ-दहा जणांना बोलावून देशमुख कुटुंबावर हल्ला केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाने काल खडकपाडा पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. त्याआधी त्याने स्वत:ची बाजू मांडणारा व्हिडिओ पोस्ट केला. अखिलेश शुक्ला आपण बडे सरकारी अधिकारी आहोत हे दाखवण्यासाठी गाडीवर लालदिवा लावून फिरायची अशी माहिती मिळाली होती. अखिलेश शुक्ला हा राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात (MTDC) नोकरीला आहे.
पोलिसांना गाडीत काय सापडलं?
पोलिसांनी अखिलेश शुक्लाला अटक केल्यानंतर त्याची गाडी जप्त केली. त्याच्या गाडीतून लालबत्ती व शासकीय अंबरदिवा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलं होतं. खडकपाडा पोलिसांनी स्थानिक नागरिक व पीडित कुटुंबाच्या आरोपांच्या आधारे अखिलेश शुक्ला याची गाडी जप्त केली आहे. या गाडीवर “महाराष्ट्र शासन” असे लिहिलेले असून, लालबत्तीचा शासकीय अंबरदिवा देखील गाडीतून मिळाला आहे.
RTO ने काय कारवाई केली?
मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाच्या गाडीला आरटीओने आकारला दंड. बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यामुळे 9500 चा आकारला दंड. इन्शुरन्स अँड पीयूसी नसल्याने लावला दंड.
आतापर्यंत किती आरोपींना अटक?
मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात एकूण 10 आरोपीं असून यात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात अखिलेश शुक्ला याला अटक करताच, त्याची गाडी देखील खडकपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. मंत्रालयातील मोठा अधिकारी असल्याचे भासवून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत होता. मात्र, पोलिसांनी दहशतीला न जुमानता गुन्हा दाखल करत पुढील कारवाई केली आहे.