कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस वैरी होऊन कोसळतोय. कल्याण पूर्वेतील आडवली ढोकळी भागात तर प्रचंड भयानक अवस्था आहे. या भागातील इमारतींच्या तळमजल्यातील घरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाणी भरलं आहे. परिसरातील नागरीक प्रचंड हैराण झाले आहेत. याप्रकरणी नागरिक आणि स्थानिक माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाकडे तक्रारही केलीय. मात्र, अद्यापही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केलेलं नाही. या भागातील नागरिकांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना आपल्या व्यथा मांडल्या. नागरिकांचा जगण्याचा एक वेगळा संघर्ष सुरु असताना पाणी शिरण्याच्या या नव्या संकटाने त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
या परिसरातील रहिवासी शिल्पा नायर या महिलेने आपली व्यथा मांडली. तिच्या घरात तीन दिवसांपासून पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील टीव्ही, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साधने खराब झाली आहेत. गटारीचे सांडपाणी तिच्या घरात शिरलं आहे. त्यामुळे घरात राहायचे कसे? असा सवाल तिने केला आहे. तिच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाणी साचल्याने खराब रस्त्यातून घरापर्यंत रिक्षा येत नाही. तिची सून गरोदर आहे. त्यामुळे आम्ही जायचं कुठे आणि राहायचं कुठं? असा संतप्त सवाल हतबल महिलेने उपस्थित केलाय.
“मी परवा कामावरुन आली तेव्हा खड्ड्यात पाय गेल्याने रस्त्यावर पडली. रस्त्यांवर पाण्याचं साम्राज्य असल्याने आतमध्ये रिक्षा येत नाही. रिक्षावाले सांगतात मुख्य रस्त्यावर रिक्षा पकडण्यासाठी यायचं. आम्ही कसे बाहेर जाणार? रस्ते नीट करा. तीन दिवसांपासून आमच्या घरात ड्रेनेजचं पाणी भरलेलं आहे. मी तीन दिवसांपासून जेवलेली नाही. माझ्या घरातील परिस्थिती तर प्रचंड भयानक आहे. माझा फ्रीज, टीव्ही जळून गेला. गॅसचं कनेक्शन फुटलंय. माझ्या घरात अजूनही सांडपाणी आहे. माझ्या पतीला अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. माझी सून गरोदर आहे. केडीएमसीला वेळ होता तेव्हा त्यांनी साफसफाई का केली नाही? त्यांनी कोरोनाच्या नावावर आज नाही उद्या करणार सांगितलं”, अशा शब्दात महिलेने व्यथा मांडली.
दुसरीकडे सुनिता गौंडा नावाच्या महिलेने आत्मदहन करण्याचा इशारा दिला. “आम्ही कर्ज काढून अंगावरील दागिने विकून याठिकाणी घरे घेतली आहेत. आता आम्ही विष खाऊन मरायचं राहिलं आहे. केवळ कोरोनाचे कारण देत महापालिका काहीच पावले उचलत नाही. केडीएमसीने काहीच उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आत्महदन करु”, असा इशारा महिलेने प्रशासनाला दिला.
याप्रकरणी आता तेथील स्थानिक माजी नगरसेवक कुणाल पाटील हे देखील आक्रमक झाले आहेत. केडीएमसीकडे तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने साचलेल्या पावसाच्या पाण्यात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केडीएमसीच्या विरोधात घोषणाबाजी करीत केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. केडीएमसीने दखल घेतली नाही तर कल्याण शील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. तसेच कल्याण मलंगगड रस्त्यावरही रास्ता रोको आंदोलन करुन रस्ता थांबवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कल्याण पूर्वेतील आडवली ढोकळी परिसरातील विदारक वास्तव. महिला किती जिवांच्या आकांताने आपली व्यथा मांडत आहे. यापैकी एका महिलेच्या पतीला अर्धांग वायूचा झटका आलाय. आणि तिची सून गरोदर आहे. तर दुसऱ्या महिलेने आता संतापात आत्मदहन करण्याचा इशारा दिला. प्रशासन यांची कधी दखल घेणार? pic.twitter.com/wg5T1eyOnk
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) July 21, 2021
संबंधित बातमी : …तर कल्याण शीळ, मलंगगड रस्ता बंद करणार, माजी नगरसेवकाचा केडीएमसीला मोठा इशारा