‘बंगला घोटाळा, मेव्हण्यांची जप्ती, आदित्य ठाकरेंचे सात कोटी, याची उत्तरे उद्याच्या सभेत मुख्यमंत्री देणार का’, किरीट सोमय्यांचा सवाल
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गहाण ठेवलं, मुख्यमंत्री पूर्ण हिरवे झालेत, अशी बोचरी टीका भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या मुलाला अयोध्येला पाठवतात, मात्र राज्यात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकतात, हे योग्य नसल्याची टीकाही किरिट सोमय्यांनी केली आहे.
उल्हासनगर – आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) सात कोटींची चोरी, मेव्हण्याची साडे सहा कोटींची जप्त झालेली मालमत्ता, रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांचा घोटाळा, या प्रश्नांची उत्तरे शनिवारी होणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena)सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून (Chief Minister Uddhav Thackeray)उत्तरे मिळणार का, असा सवाल भाजपाचे नेते किरिट सोमय्यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या बीकेसीतील सभेवर त्यांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री हे मीडिया एजन्सीचा सल्ला घेतात, त्यामुळे वसुली, बेघर लोकांचा प्रश्न, हल्ले यावर उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. किरिट सोमय्या भाजपाच्या आंदोलनासाठी उल्हासनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंकडे उत्तरे नसल्याने केवळ सभांचे टीझर काढून, टाईमपास करुन सगळ्या मुख्य मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गहाण ठेवले
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गहाण ठेवलं, मुख्यमंत्री पूर्ण हिरवे झालेत, अशी बोचरी टीका भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या मुलाला अयोध्येला पाठवतात, मात्र राज्यात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकतात, हे योग्य नसल्याची टीकाही किरिट सोमय्यांनी केली आहे. राम हा हिंदुस्थानचा असा देव आहे की, प्रत्येकजण रामराज्य आणण्याचा प्रयत्न करतो. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामभक्त हनुमान यांची हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात. अशी टीका त्यांनी केलीय. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना झालेल्या अटक प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राज ठाकरेंना दर्शन मिळायला हवे
त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दैऱ्याबाबत विचारले असता, रामाचं दर्शन घेण्यासाठी ज्यांना जायचं असेल त्यांना दर्शन मिळायला हवं, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्याचे मुख्यमंत्री हे नौटंकी असल्याचे सांगत याही मुद्द्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. एक नेता अयोध्येला जातोय म्हणून मुख्यमंत्री मुलाला अयोध्येला पाठवत असल्याची टीकाही त्यांनी केली.
राममंदिराच्या श्रेयावरुनही टीका
राममंदिराचं श्रेय घेण्याचा शिवसेना प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी जे पूर्ण हिरवे झाले आहेत, त्यांच्याकडून रामाचं नाव म्हणजे आश्चर्यजनक असल्याची टीका सोमय्यांनी केली आहे.