गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग, कल्याण-ठाकुर्लीदरम्यान घडली घटना
या दुर्घटनेत आतापर्यंत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
LTT Gorakhpur Express Break Liner Fire : लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकातून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत एक्सप्रेसच्या एका डब्ब्याच्या खाली असलेल्या ब्रेक लायनरला आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आजूबाजूला धुराचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
कोणालाही गंभीर दुखापत नाही
तसेच यात अनेक प्रवाशी हे त्यांच्या सामानासह गाडीतून खाली उतरत असतानाही दिसत आहे. या आगीमुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
गाडी कल्याण दिशेने रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.45 दरम्यान ठाकुर्ली स्थानकाजवळ लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाईनअरमध्ये अचानक आग लागली होती. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या गाड्यावर परिणाम पाहायला मिळाला. पण त्यानंतर आता ही गाडी कल्याण दिशेने रवाना झाली आहे.
मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
तर दुसरीकडे यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्ये रेल्वेच्या अनेक लोकल सेवा या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. कसारा आणि कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.